मुंबईत 38 हजार कोटींच्या विकासप्रकल्पांची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी

- दोन मेट्रो मार्गिकांचे लोकार्पण

38 हजारमुंबई – गुरुवारी मुंबईच्या भेटीवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील 38 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे भूमीपूजन केले. तसेच पंतप्रधानांच्या हस्ते मुंबईतील दोन मेट्रो मार्गांचे लोकार्पण करण्यात आले. भव्य स्वप्ने पाहून ती साकार करून दाखविण्याची धमक देशाकडे आलेली आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. तसेच देशाची शहरे म्हणजे विकासाचे इंजिन असून या शहरांमधील पायाभूत सुविधांच्या विकासाकडे सरकार लक्ष केंद्रीत करीत आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. बीकेसीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत पंतप्रधान मोदी यांच्यासह राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

साऱ्या जगाचा आर्थिक विकास खुंटत असताना, भारत मात्र आपल्या पायाभूत सुविधांच्या विकासप्रकल्पांसाठी मोठी गुंतवणूक करीत आहे. भारताला विकसित देश बनविण्याची वचनबद्धता यातून स्पष्ट होते, असा दावा पंतप्रधानांनी केला. तसेच मुंबईसाठी राबविल्या जात असलेल्या विकासप्रकल्पांची माहिती यावेळी पंतप्रधानांनी दिली. तसेच पुढच्या काळात भारताच्या आर्थिक प्रगतीचे इंजिन म्हणून शहरे काम करतील, असा विश्वास यावेळी पंतप्रधानांनी व्यक्त केला. याच कारणामुळे शहरांमधील पायाभूत सुविधांना फार मोठे महत्त्व असल्याची बाब पंतप्रधानांनी अधोरेखित केली. तसेच यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

देशाच्या सर्वच शहरांमध्ये बहुपेडी वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य दिले जात आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. मुंबईतील मेट्रो मार्ग 2ए आणि मेट्रो मार्ग 7 यांचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. या सुमारे 12 हजार, 600 रुपयांच्या या प्रकल्पामुळे मुंबईच्या वाहतुकीवरील ताण बऱ्याच प्रमाणात कमी होऊन मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ होईल, असा दावा केला जातो. याबरोबरच 26 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कमेच्या सांडपण्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाचे भूमीपुजन पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी पार पडले. मालाड, भांडूप, वर्सोवा, घाटकोपर, वांद्रे, धारावी आणि वरळी या ठिकाणी याचे प्रकल्प उभे राहणार आहेत. याबरोबरच पंतप्रधानांनी मुंबईत तीन ठिकाणी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्सची पायाभरणी केली. भांडूप, गोरेगाव व ओशिवारा येथे ही हॉस्पिटल्स उभी राहणार आहेत.

याबरोबरच मुंबईतील सुमारे 400 किलोमीटर इतक्या मार्गांचे कॉक्रिंटीकरण करण्यात येणार असून सुमारे सहा हजार, 100 कोटींच्या या प्रकल्पामुळे मुंबईच्या रस्त्यातील खड्यांची समस्या सुटू शकेल. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या अद्ययावतीकरण करण्यात येणार असून या कार्याचा शुभारंभही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. यासाठी सुमारे 1800 कोटी रुपये इतकी तरतूद करण्यात आलेली आहे.

leave a reply