पाकिस्तानबरोबरील संबंध सुधारण्यासाठी दहशत व हिंसाचारमुक्त वातावरण अपेक्षित

- भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचा टोला

हिंसाचारमुक्त वातावरणनवी दिल्ली – पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारताला दिलेल्या चर्चेच्या प्रस्तावावर परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे. भारताला इतर शेजारी देशांप्रमाणे पाकिस्तानशीही उत्तम संबंध हवे आहेत. पण अशा संबंधांसाठी दहशतवाद व हिंसाचारमुक्त वातावरण अपेक्षित आहे, अशा नेमक्या शब्दात परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी आपली भूमिका मांडली. भारताची ही भूमिका कायम असल्याचेही बागची यांनी स्पष्ट केले.

युएईच्या दौऱ्यावर वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारताला चर्चेचा प्रस्ताव दिला होता. भारताबरोबरच्या तीन युद्धांमधून मिळालेला धडा पाकिस्तानने घेतला असून यातून आपल्या देशाला काहीच मिळाले नाही, उलट गरीबी व बेरोजगारी वाढली, असे शहाणपणाचे उद्गार पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी काढले. म्हणूनच आम्ही भारताच्या पंतप्रधानांना चर्चेचा प्रस्ताव देत आहोत, असे सांगून शरीफ यांनी खळबळ माजविली होती. मात्र त्यांच्या या प्रस्तावाला काही तास उलटत नाही तोच, पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाकडून भारताने कलम 370 पुन्हा लागू केल्याखेरीज चर्चा शक्य नसल्याचा निर्वाळा दिला होता. भारताकडून चर्चेच्या प्रस्तावाला प्रतिसाद न मिळाल्याने पाकिस्तानला हा यु-टर्न घ्यावा लागल्याचे बोलले जात आहे.

यासंदर्भात बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी नेमक्या शब्दात भारताची भूमिका मांडली. उत्तम संबंधांसाठी दहशतवाद व हिंसाचारमुक्त वातावरण अपेक्षित आहे, तसे झाल्यानंतर भारत पाकिस्तानशी चर्चा करील, असे बागची यांनी म्हटले आहे. तसेच आधीच्या काळातही भारताची हीच भूमिका होती व यापुढेही भारत यावर ठाम राहिल, असे स्पष्ट संकेत यावेळी बागची यांनी दिले. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी देखील दहशतवादाचा वापर करून भारताला कुणीही चर्चेसाठी वेठीस धरू शकत नाही, अशा शब्दात पाकिस्तानला इशारा दिला होता.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारताला चर्चेचा प्रस्ताव देऊन आपल्या देशाचा कमकुवतपणा जगजाहीर केल्याची तक्रार या देशाची माध्यमे करीत आहेत. भारताने त्यांच्या या प्रस्तावाला काडीचीही किंमत दिली नाही, अशी खंत देखील पाकिस्तानी माध्यमे तसेच विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत, पाकिस्तानने दहशतवाद थांबविल्याखेरीज चर्चा शक्य नसल्याचे बजावून भारताने पाकिस्तानचा दहशतवाद अजूनही सुरू असल्याचा संदेश जगाला दिला आहे.

leave a reply