युक्रेनला करण्यात येणाऱ्या शस्त्रपुरवठ्यावरून अमेरिका व जर्मनीमध्ये तीव्र मतभेद

अमेरिकेसह नाटो देशांकडून युक्रेनला मोठ्या संरक्षणसहाय्याचे संकेत

Us and Germanyबर्लिन/वॉशिंग्टन/किव्ह – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याकडून सातत्याने करण्यात येणाऱ्या आवाहनांच्या पार्श्वभूमीवर अमेरिका व इतर नाटो सदस्य देशांनी युक्रेनला मोठ्या संरक्षणसहाय्याचे संकेत दिले आहेत. अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, स्वीडन, पोलंड, लाटव्हिया, इस्टोनिआ या देशांनी युक्रेनला शस्त्रास्त्रे पुरविण्याचे जाहीर केले. अमेरिकेकडून जवळपास अडीच अब्ज डॉलर्सचा शस्त्रपुरवठ्याची घोषणा होणार असल्याचे ‘पेंटॅगॉन’मधील सूत्रांनी सांगितले. युक्रेनमध्ये शस्त्रांचा ओघ सुरू होत असताना याच मुद्यावरून अमेरिका व जर्मनी या आघाडीच्या देशांमधील वाद ऐरणीवर आल्याचेही समोर येत आहे.

अमेरिका व युरोपिय देशांनी मिळून आतापर्यंत युक्रेनला जवळपास 30 अब्ज डॉलर्सचे शस्त्रसहाय्य केले आहे. मात्र त्यानंतरही रशियाचे प्रखर हल्ले व आगेकूच रोखण्यात युक्रेनला फार मोठे यश मिळालेले नाही. उलट रशियावर प्रतिहल्ले चढविण्याचे कारण पुढे करून युक्रेनकडून अधिकाधिक शस्त्रांची मागणी करण्यात येत आहे. युक्रेनच्या या मागणीला पोलंडसह बाल्कन देशांनी जोरदार समर्थन दिले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये या देशांकडून युक्रेनला शस्त्रपुरवठा करावा यासाठी सातत्याने आक्रमक वक्तव्ये करण्यात येत आहेत. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की, त्यांची पत्नी, युक्रेनचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासह नाटो तसेच युरोपिय महासंघाच्या प्रमुखांचाही यात समावेश आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसात अमेरिकेसह अनेक देशांनी युक्रेनला नवा शस्त्रपुरवठा करण्याचे संकेत दिले आहेत. अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी कॉलिन काहल यांनी नव्या शस्त्रपुरवठ्याबाबतच्या वृत्ताला दुजोरा दिला. सूत्रांच्या माहितीनुसार, अमेरिकेचे नवे पॅकेज सुमारे अडीच अब्ज डॉलर्सचे असून त्यात ‘स्ट्रायकर टँक्स’, ‘जीएलएसडीबी मिसाईल्स’, ‘हायमार्स रॉकेटस्‌‍’ व इतर संरक्षणसामुग्रीचा समावेश असणार आहे. मात्र युक्रेनने मागणी केलेली दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे सहाय्याचा भाग नसल्याची माहिती अमेरिकी अधिकाऱ्यांनी दिली.

us stryker tankकॅनडाकडून 200 ‘सिनेटर’ सशस्त्र वाहने, स्वीडनकडून 50 सशस्त्र वाहने, ‘आर्चर आर्टिलरी सिस्टिम’ व रणगाडाभेदी क्षेपणास्त्रे तर लाटव्हियाकडून ‘स्टिंगर मिसाईल्स’ देण्यात येणार आहेत. फ्रान्सकडून ‘लेक्लर्क’ रणगाडे तर पोलंडकडून ‘लिओपाल्ड टँक्स’ देण्याचे संकेत देण्यात आले आहेत. इस्टोनियाने युक्रेनला 12 कोटी डॉलर्सची शस्त्रे पुरविण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. काही दिवसांपूर्वी ब्रिटननेही ‘चॅलेंजर टँक्स’ देण्याचा निर्णय जाहीर केला होता.

अमेरिकेसह नाटो सदस्य देश शस्त्रपुरवठा वाढविण्याचे संकेत देत असताना याच मुद्यावरून अमेरिका व जर्मनी या दोन देशांमधील वाद ऐरणीवर आला आहे. अमेरिका व काही युरोपिय देश जर्मनीवर ‘लिओपार्ड 2’ हे प्रगत रणगाडे पुरविण्यासाठी दडपण आणत आहेत. या मुद्यावर जर्मनीने आक्रमक भूमिका घेताना अमेरिकेने त्यांचे ‘अब्राम्स’ रणगाडे युक्रेनमध्ये पाठविले तरच आपण आपले रणगाडे युक्रेनमध्ये पाठवू, असा उघड इशारा दिला आहे. प्रगत रणगाडे युक्रेनला दिल्यास रशिया-युक्रेन संघर्ष अधिक चिघळेल, अशी भीती जर्मन नेत्यांनी यापूर्वी व्युक्त केली होती. जर्मनीवरील दबाव वाढविण्यासाठी अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन लवकरच युरोपमध्ये दाखल होत असल्याचे सांगण्यात येते.

leave a reply