भारत-रशिया व्यापारात ४०० टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली/मॉस्को – भारत व रशियामधील द्विपक्षीय व्यापारात २०२२-२३ या आर्थिक वर्षात तब्बल ४०० टक्क्यांची वाढ झाली आहे. भारताच्या वाणिज्य मंत्रालयाने ही माहिती दिली. या द्विपक्षीय व्यापारात भारताच्या आयातीचा वाटा मोठा असून भारताने रशियाकडून ३७ अब्ज डॉलर्सहून अधिक आयात केल्याचे समोर आले. या वाढत्या व्यापाराच्या पार्श्वभूमीवर भारताकडून जाहीर करण्यात आलेल्या ‘मर्चंडाईझ इम्पोर्ट सोर्स नेशन’च्या यादीत रशियाने चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

oil-genericयुक्रेनचे युद्ध पेटल्यानंतर अमेरिका व युरोपिय देशांनी रशियाच्या इंधन निर्यातीला लक्ष्य केले होते. त्याला काटशह देण्यासाठी रशियाने भारताला सवलतीच्या दरात इंधनतेल पुरविण्याचा प्रस्ताव दिला. याचा लाभ घेऊन भारतीय इंधनकंपन्यांनी रशियाकडून मोठ्या प्रमाणात इंधनतेलाची खरेदी सुरू केली. भारताने रशियाकडून इंधनाची खरेदी करू नये, यासाठी अमेरिका व युरोपिय देशांनी दबाव टाकला होता. मात्र भारताने हा दबाव झुगारून दिला होता. इंधनाचे दर कडाडलेले असताना, भारत आपल्या जनतेसाठी स्वस्तात उपलब्ध असलेले इंधन खरेदी करीत राहिल, असे भारताने अमेरिका व युरोपला बजावले होते.

भारताने रशियाकडून आपल्या एकूण मागणीच्या तब्बल २८ टक्के इतके इंधन आयात केले आहे. जानेवारी महिन्यात रशियाकडून भारताने आयात केलेल्या कच्च्या तेलाचे प्रमाण प्रतिदिनी १४ लाख बॅरल्सपर्यंत पोहोचले आहे. यामुळे अमेरिकेने रशियाच्या इंधननिर्यातीवर टाकलेले निर्बंध निष्फळ ठरल्याची टीका होत आहे. मात्र भारताने इंधनाची खरेदी करताना, आपल्या जनतेला परवडणाऱ्या दरात इंधनाची खरेदी करण्याला आम्ही प्राधान्य देऊ असे स्पष्ट केले होते. हे इंधन रशियाकडून घ्यायचे की अन्य कुठल्या देशाकडून याचा निर्णय भारताचे सरकार नाही, तर राष्ट्रीय इंधनकंपन्या घेतात, असे भारताने याआधीच बजावले होते. तर रशियाकडून इंधन खरेदी करणाऱ्या भारतावर निर्बंध टाकणार नाही, अशी ग्वाही अमेरिकेला द्यावी लागली होती. त्यामुळे पुढच्या काळात भारताचा रशियाबरोबरील इंधनव्यवहार तसेच इतर क्षेत्रातील व्यापारही अधिकाधिक वाढण्याची दाट शक्यता आहे. या द्विपक्षीय व्यापारात भारताच्या आयातीचा हिस्सा अधिक असला तरी पुढच्या काळात रशियाला मोठ्या प्रमाणात निर्यात करायची तयारी देखील भारताच्या उद्योगक्षेत्राने केलेली आहे.

हिंदी

leave a reply