इराण ५० देशांना क्षेपणास्त्र व ड्रोन्सची विक्री करण्याच्या तयारीत

- इस्रायलच्या संरक्षणमंत्र्याचा इशारा

म्युनिक – आखातातील छोट्या दहशतवादी संघटनांना ड्रोन्सचा पुरवठा करणारा देश म्हणून इराणची ओळख होती. पण इराण आता किमान ५० देशांना क्षेपणास्त्र व ड्रोन्सची विक्री करणार असल्याचा इशारा इस्रायलचे संरक्षणमंत्री योआव्ह गॅलंट यांनी दिला. इराणचा हा व्यवहार बेकायदेशीर असून पाश्चिमात्य देशांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इराणवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी गॅलंट यांनी केली.

जर्मनीच्या म्युनिक येथे सुरू असलेल्या सुरक्षा परिषदेत बोलताना इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी इराणपासून असलेला धोका अधोरेखित केला. युक्रेनच्या विरोधात वापरले जाणाऱ्या ‘शाहेद १३६’ हल्लेखोर ड्रोन्ससह इराण इतरही ड्रोन्सची विक्री करणार आहे. ड्रोन्ससह अचूक हल्ला चढविणाऱ्या प्रिसिजन गायडेड क्षेपणास्त्रांची विक्री करण्यासाठी इराण किमान ५० देशांच्या संपर्कात आहे. बेलारूस ते व्हेनेझुएला या देशांनी इराणी बनावटीच्या ड्रोन्स व क्षेपणास्त्रांच्या खरेदीत स्वारस्य दाखविले आहे, अशी माहिती इस्रायलचे संरक्षणमंत्री गॅलंट यां दिली. दरम्यान, २०१५ सालच्या अणुकराराप्रमाणे इराणवर क्षेपणास्त्र व ड्रोन्सची विक्री करण्यावर निर्बंद लादले आहेत. असे केल्यास इराण सदर कराराचे उल्लंघन करीत असल्याचे मानले जाईल. याकडे लक्ष वेधून इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी इराणवर निर्बंधांची कारवाई करण्याची मागणी केली आहे. इराणची क्षेपणास्त्रे व ड्रोन्स आखाती देशांसह साऱ्या जगाच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू लागल्याचा आरोप गॅलंट यांनी केला.

leave a reply