उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीनंतर अमेरिका व दक्षिण कोरियाचा संयुक्त हवाईसराव

अमेरिकी बॉम्बरचा सरावात सहभाग

North Korea's missile testसेऊल – शनिवारी दुपारी उत्तर कोरियाने घेतलेल्या क्षेपणास्त्र चाचणीला दक्षिण कोरियाने प्रत्युत्तर दिले आहे. रविवारी दक्षिण कोरिया व अमेरिकेने कोरियाच्या ‘एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन’मध्ये हवाईसराव केला. या सरावात ‘एफ-१५’, ‘एफ-१६’ व ‘एफ-३५’ या लढाऊ विमानांसह अमेरिकेचे बॉम्बर विमानही सहभागी झाले होते. दक्षिण कोरियाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्यास अमेरिका झटपट कशा रितीने आपली संरक्षणदले कार्यरत करील, याची चाचणी या सरावात घेण्यात आल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या संरक्षण विभागाने दिली. या सरावाच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जाँग-उन यांची बहीण किम यो-जाँग यांनी अमेरिका व दक्षिण कोरियाला पुन्हा धमकावले आहे.

Us and South Koreaकाही आठवड्यांपूर्वी अमेरिकेने दक्षिण कोरियाबरोबर दोन व्यापक युद्धसरावांची घोषणा केली होती. या घोषणेनंतर उत्तर कोरियाने आक्रमक भूमिका घेतली असून सातत्याने दोन्ही देशांना धमकावित आहे. शुक्रवारी उत्तर कोरियाने नवी धमकी देत सरावांना प्रत्युत्तर देण्यात येईल, असे म्हटले होते. त्यानंतर अवघ्या २४ तासात उत्तर कोरियाने आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. शनिवारी दुपारी घेण्यात आलेल्या या चाचणीतील क्षेपणास्त्राने जवळपास सहा हजार किलोमीटर्सची उंची गाठली होती.

रविवारी उत्तर कोरियाने या आंतरखंडीय क्षेपणास्त्राच्या चाचणीची कबुली देताना सदर क्षेपणास्त्र ‘ह्वासाँग-१५’ असल्याचे जाहीर केले. शनिवारची चाचणी उत्तर कोरियाची ‘न्यूक्लिअर डिटरंट’ क्षमता चाचपण्यासाठी होती, असेही सांगण्यात आले. या कबुलीपाठोपाठ हुकुमशहा किम जाँग-उन यांची बहीण किम यो-जाँग हिने नवी धमकीही दिली. उत्तर कोरियाच्या विरोधात कोणतीही आक्रमक पावले उचलली तर त्याला जबरदस्त व व्यापक कारवाईने प्रत्युत्तर मिळेल, असे किम यो-जाँगने बजावले.

joint air exerciseया धमकीनंतरही दक्षिण कोरिया व अमेरिकेने लढाऊ विमाने तसेच बॉम्बरच्या साथीने संयुक्त हवाईसराव केला. सरावादरम्यान दक्षिण कोरिया व अमेरिकेच्या विमानांनी ईस्ट सी व यलो सीच्या हद्दीतही घिरट्या घातल्याची माहिती दक्षिण कोरियाने दिली. सरावात दोन्ही देशांची मिळून दहा विमाने सहभागी झाली होती. दक्षिण कोरियाला धोका निर्माण झाल्यास अमेरिका व दक्षिण कोरिया किती झटपट आपली तैनाती करु शकतात, याचा सराव यात झाल्याचे दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी जपान व दक्षिण कोरियाला भेट दिली होती. यावेळी ऑस्टिन यांनी दक्षिण कोरियाला नाटोच्या धर्तीवर सुरक्षा पुरवू, अशी ग्वाही दिली होती. त्याचवेळी अमेरिका दक्षिण कोरियातील आपली तैनाती वाढविणार असल्याचे संकेतही दिले होते. अमेरिकेच्या या तयारीनंतरही उत्तर कोरियाने आपल्या धोरणात बदल केले नसून क्षेपणास्त्र चाचण्यांचे सत्र सुरू ठेवल्याचे शनिवारच्या चाचणीवरून दिसून आले. त्याचवेळी अशा कारवायांविरोधात तातडीने पावले उचलण्याची तयारी अमेरिका व दक्षिण कोरिया करीत असल्याचे रविवारच्या हवाईसरावावरून दिसून आल्याचा दावा विश्लेषकांनी केला आहे.

हिंदी

leave a reply