वीस वर्षात चीनमधून पाच भयंकर साथी उगम पावल्या – अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची मर्मभेदी टीका

वॉशिंग्टन – ‘जगभरात सुमारे तीन लाख जणांचा बळी घेणाऱ्या कोरोनाव्हायरसच्या महाभयंकर साथीला चीनच जबाबदार आहे. कोरोनाबरोबरच गेल्या वीस वर्षात जगभरात आलेल्या पाच साथींचा उगम देखील चीनमधूनच झाला होता. हे आता थांबवावेच लागेल’, अशा मर्मभेदी शब्दात अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ’ब्रायन यांनी चीनपासून साऱ्या जगाला असलेला धोका अधोरेखित केला. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ओ’ब्रायन यांच्याबरोबर अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’ आणि मध्यावरती तपास यंत्रणा ‘एफबीआय’ने चीनवर गंभीर आरोप केले आहेत.

कोरोनाव्हायरससाठी जबाबदार असलेल्या चीनला घेरण्यासाठी अमेरिकेने राजनैतिक आघाडी उघडली आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी इस्रायलचा दौरा करुन चीनवर कोरडे ओढले. तर या काळात अमेरिकेच्या सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांनी चीनवरील आरोपांची धार वाढविली आहे. ‘कोरोनाव्हायरसचा उगम चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतूनच झाला व याचे सबळ पुरावे अमेरिकेकडे आहेत’, असा निर्वाळा अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ’ब्रायन यांनी माध्यमांशी बोलताना दिला.

त्याचबरोबर ओ’ब्रायन यांनी चीनमधून उगम पावलेल्या साथींची जंत्री माध्यमांसमोर वाचून दाखवली. गेल्या वीस वर्षात चीनमधून सार्स, एवियन फ्ल्यू, स्वाईन फ्ल्यू, कोरोनाव्हायरस अशा महाभयानक साथींचा जन्म झाल्याची आठवण ओ’ब्रायन यांनी जगाला करुन दिली. ‘या साथींचा उगम चीनमधून होतो, हे आता उघड झाले असून जगभरातील जनताच चीनच्या सरकारला यापुढे सवाल करील’, असा दावा ओब्रायन यांनी केला.

ओ’ब्रायन यांनी चीनवर चढविलेल्या हल्ल्याला काही तास उलटत नाही तोच, अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’ने चीनवर नवा आरोप केला आहे. जानेवारी महिन्यात कोरोनाव्हायरसचा फैलाव इटली आणि स्पेनमध्ये झाल्यानंतर चीनने ‘जागतिक आरोग्य संघटने’ला (डब्ल्यूएचओ) धमकावले होते. कोरोनाव्हायरस ही महामारी असल्याची घोषणा करण्यासाठी ‘डब्ल्यूएचओ’ने चालढकल करावी यासाठी चीनने दबाव टाकला होता, असा आरोप ‘सीआयए’ने आपल्या अहवालात केला आहे.

तर अमेरिकेतील कोरोनावरील संशोधन चोरण्याच्या प्रयत्नात असलेले चिनी हॅकर्स अमेरिकेच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात, असा इशारा ‘एफबीआय’ या अमेरिकेच्या मध्यवर्ती तपास यंत्रणेने दिला आहे. या हॅकर्सचे थेट संबंध चीनच्या लष्कराशी असल्याची माहिती ‘एफबीआय’ने उघड केली. तर कोरोनाचा उगम अमेरिकेतूनच झाला, असे पटवून देण्यासाठी चीनने सोशल मीडियावर ‘बॉट आर्मी’ उभारल्याचा आरोप ब्रिटनमधील शोधपत्रकाराने केला आहे. बॉट आर्मी अर्थात बनावट व्यक्तिमत्वांची फौजच उभी केल्याचा आरोप या शोधपत्रकाराने केला आहे.

दरम्यान, अमेरिकेने केलेले हे आरोप चीनने फेटाळले आहेत. अमेरिका कुठल्याही पुराव्याशिवाय आरोप करीत असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

leave a reply