चोवीस तासात जगभरात कोरोनाचे सात हजाराहून अधिक बळी

वॉशिंग्टन/बर्लिन,  (वृत्तसंस्था) – कोरोनाव्हायरसमुळे जगभरात दगावलेल्यांची संख्या २,९४,४१२ वर गेली आहे. तर कोरोनाबाधितांची संख्या ४३ लाखांवर गेली असून १६ लाखांहून अधिक जण बरे झाले आहेत. गेल्या चोवीस तासात जगभरात या साथीचे सात हजाराहून अधिक बळी गेले. तर ८४ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. या चोवीस तासांमध्ये अमेरिकेत १८९४ जण दगावल्याची माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर मंगळवारी  अमेरिकेत २३ हजार नवे रुग्ण सापडले आहेत.

अमेरिकेतील या साथीच्या बळींच्या संख्येत घट होत असली तरी रुग्णांची संख्या मात्र वाढत चालली आहे. मात्र लॉकडाउनमुळे अमेरिकेचे जबर आर्थिक नुकसान होत असून ते टाळण्यासाठी लॉकडाउन मागे घेण्याची तयारी अमेरिकेतील काही राज्यांनी केली आहे. पण कोरोनाचा बंदोबस्त केल्याशिवाय लॉकडाउन काढण्याची घाई केली तर या साथीच्या रुग्णांची संख्या अधिकच वाढेल, असा इशारा डॉ. फॉकी यांनी दिला आहे.

युरोपमध्ये या साथीने गेल्या चोवीस तासात २८०० हून अधिक जणांचा बळी घेतला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी या साथीबाबत देशवासियांना इशारा दिला. कदाचित या साथीची लस देखील मिळणार नाही, असे सांगून जॉन्सन यांनी यासाठीही जनतेने तयार रहावे, असे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर पुढच्या महिन्यापासून लॉकडाउन शिथिल केले जातील, असे जॉन्सन यांनी म्हटले आहेत. लॉकडाउनबाबत ब्रिटनच्या पंतप्रधानांची भूमिका संभ्रम वाढविणारी असल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात आहे. तर जर्मनी, ऑस्ट्रिया या देशांनी सीमारेषा खुली करण्याचा निर्णय घातला आहे. कोरोनाव्हायरसच्या  साथीवर नियंत्रण मिळविल्याचा दावा करुन जर्मनीने १५ जूनपासून आपल्या सीमा खुल्या करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ऑस्ट्रियाने देखील असाच दावा करुन लवकरच आपल्या सीमा खुल्या केल्या जातील, असे म्हटले आहे.  

ब्राझिल आणि रशियामध्ये गेल्या चोवीस तासात या साथीचे प्रत्येकी दहा हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत. यामुळे रशियातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २,४२,२७१ वर पोहोचली आहे. तर चीनच्या जलिन शहरात पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे आणखी सात रुग्ण सापडले आहेत. या घटनेनंतर चीनने जलिन शहरात लॉकडाउनची घोषणा केली आहे.

leave a reply