अफगाणिस्तानच्या काबुलमधील प्रार्थनास्थळाजवळ स्फोट

- किमान 50 जण ठार आणि जखमी

प्रार्थनास्थळाजवळकाबुल – अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये प्रार्थनास्थळाजवळ झालेल्या कारबॉम्ब स्फोटात सात जणांचा बळी तर 41 जण जखमी झाले आहेत. स्फोटानंतर घटनास्थळाजवळून गोळीबाराचे आवाज देखील ऐकू येत होते. या हल्ल्याची जबाबदारी कुठल्याही संघटनेने स्वीकारली नसली तरी यासाठी ‘आयएस’वर संशय व्यक्त केला जात आहे. गेल्या महिन्याभरात अफगाणिस्तानातील प्रार्थनास्थळावर झालेला हा दुसरा हल्ला ठरतो.

काबुलच्या ‘वझिर मोहम्मद अकबर खान’ भागातील प्रार्थनास्थळाजवळ शुक्रवारी हा स्फोट झाला. येथे पार्क केलेल्या मोटारीत झालेल्या स्फोटामध्ये प्रार्थनास्थळातून बाहेर पडणाऱ्या अफगाणी नागरिकांना लक्ष्य केले. कानठळ्या बसणाऱ्या या स्फोटामुळे आजूबाजूचे मोठे नुकसान झाल्याचे फोटोग्राफ्स सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसेच स्फोटाच्या दहा मिनिटानंतर या भागातून गोळीबाराचे आवाज ऐकू आल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

काबुल पोलीस विभागाचा तालिबानी प्रवक्ता खालिद झरदान याने गोळीबाराच्या दाव्यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले. पण प्रार्थनास्थळाजवळ झालेल्या स्फोटाची चौकशी सुरू असल्याची माहिती झरदान याने दिली. अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई या हल्ल्याची तीव्र शब्दात निर्भत्सना केली. प्रार्थनास्थळावर हल्ला चढविणे हा अक्षम्य गुन्हा असल्याचे माजी राष्ट्राध्यक्ष करझाई तसेच तालिबानने म्हटले आहे.

प्रार्थनास्थळाजवळवझिर मोहम्मद अकबर खान हे काबुलमधील अतिसंरक्षित ‘ग्रीन झोन’ भाग म्हणून ओळखला जातो. तालिबानने काबुलचा ताबा घेण्याआधी या भागात परदेशी दूतावास तसेच नाटोचे कार्यालय होते. या भागाची सुरक्षा नाटोकडे असताना, 2020 साली देखील याच प्रार्थनास्थळावर दहशतवादी हल्ला झाला होता. गेल्या वर्षी तालिबानने काबुलचा ताबा घेतल्यानंतर पहिल्यांदा या अतिसंरक्षित भागावर हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे.

तर तालिबानने अफगाणिस्तानात राजवट प्रस्थापित केल्यापासून येथील प्रार्थनास्थळांवरील हल्ले वाढले आहेत. गेले काही महिने काबुल तसेच अफगाणिस्तानातील इतर भागातील शिया तसेच अल्पसंख्यांकांची प्रार्थनास्थळे आणि ठिकाणांना लक्ष्य केले जात होते. पण गेल्या दोन महिन्यांमध्ये दहशतवाद्यांनी तालिबानशी संलग्न असलेली प्रार्थनास्थळे व धार्मिक नेत्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षभरातील या सर्व हल्ल्यांची जबाबदारी ‘आयएस-खोरासान’ या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती.

दरम्यान, अमेरिकेच्या अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीनंतर ‘आयएस-खोरासान’च्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याचा अहवाल काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाला होता. येथील हजारा समुदायाच्या नागरिकांना आयएसच्या दहशतवाद्यांनी सर्वाधिक लक्ष्य केले. तर काही आठवड्यांपूर्वी आयएसने तालिबानच्या वरिष्ठ कमांडरची हत्या केली होती. अफगाणिस्तानातील या हल्ल्यांसाठी आयएसच्या दहशतवाद्यांना परदेशी शक्तींचे सहाय्य मिळत असल्याचा गंभीर आरोप तालिबानने काही दिवसांपूर्वीच केला होता.

leave a reply