जर्मनीचा प्रवास आर्थिक मंदीच्या काठापर्यंत आला

- जर्मन बँक आणि विश्लेषकांचा इशारा

मंदीच्या काठापर्यंतबर्लिन – युरोपचे आर्थिक इंजिन म्हणून ओळख असलेली जर्मनी सध्या मोठ्या संकटाला सामोरे जात आहे. रशियाकडून मिळणाऱ्या इंधनावर अवलंबून असलेल्या जर्मनीतील इंधनाचे दर आकाशाला भिडले असून या देशाची अर्थव्यवस्था सध्या मंदीच्या काठापर्यंत येऊन पोहोचली आहे. जर्मन अर्थव्यवस्थेत दीर्घकाळासाठी घसरण पहायला मिळेल, असा इशारा जर्मनीच्या मध्यवर्ती बँकेने दिला. तर इंधनाचे दर वाढल्यामुळे देशात लवकरच अन्नधान्याचे संकट उभे राहणार असल्याचा दावा जर्मन वर्तमानपत्राने विश्लेषकांच्या हवाल्याने केला आहे.

जर्मनी म्हणजे युरोपचे आर्थिक इंजिन असल्याचे मानले जाते. पण आता या इंजिनाची गती कमी होत चालली असून येत्या काळात हे इंजिन बंद पडू शकते, अशी चिंता जर्मनीतील बँका, माध्यमे आणि विश्लेषक व्यक्त करीत आहेत. जर्मनी एकूण इंधन आयातीपैकी एकट्या रशियाकडून 50 टक्क्यांहून अधिक इंधनाची आयात करीत आहे. गेली 15 वर्षे जर्मनी रशियाच्या इंधन पुरवठ्यावर पूर्णपणे अवलंबून होता. पण रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध पेटल्यानंतर जर्मनीने इतर पाश्चिमात्य देशांच्या साथीने रशियावर आर्थिक निर्बंध लादले. यामुळे खवळलेल्या रशियाने जर्मनीसह युरोपिय देशांचा इंधन पुरवठा बंद केला.

मंदीच्या काठापर्यंतइंधनावर अवलंबून असलेल्या जर्मनीच्या अर्थव्यवस्थेला याचे हादरे बसू लागले आहेत. जर्मनीचे उद्योगक्षेत्र यामुळे प्रभावित झाले असून त्याचा थेट परिणाम या देशाच्या विकासावर होत असल्याचे जर्मनीची मध्यवर्ती बँक ‘बुंडेसबँक’ने आपल्या अहवालात लक्षात आणून दिले. इंधनाच्या दरवाढीमुळे या वर्षअखेरीपर्यंत जर्मनीमधील महागाई 10 टक्क्यांवर जाईल, असा इशाराही बुंडेसबँकने दिला आहे.

तर या वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आणि पुढच्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत जर्मनीची अर्थव्यवस्था अधिक आकसून जाईल, असा दावा जर्मन बँकेशी संलग्न असलेल्या विश्लेषकांनी केला. हिवाळा जसजसा जवळ येईल, त्याबरोबर जर्मनीमधील संकटाची तीव्रता वाढत जाईल, असे या विश्लेषकांचे म्हणणे आहे. तर इंधनाच्या दरवाढीमुळे याआधीच जर्मनीतील उत्पादकांनी फ्रोजन अर्थात गोठविलेल्या आणि ताज्या गोष्टींचे उत्पादन कमी केले आहे. तर बाजारातील मागणीच्या तुलनेत फारच कमी प्रमाणात पुरवठा होत असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे येत्या काळात जर्मनीत अन्नधान्य तसेच इतर जीवनावश्यक गोष्टींची टंचाई निर्माण होऊ शकते, असे काही विश्लेषक बजावत असल्याची बातमी जर्मन वर्तमानपत्राने दिली.

leave a reply