इस्रायल युएईला ‘स्पायडर’ हवाई सुरक्षा यंत्रणा पुरविणार

‘स्पायडर’जेरूसलेम – राजधानी दुबईसह प्रमुख शहरांमधील इंधन प्रकल्प व महत्त्वाच्या ठिकाणांवरील ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रांचे हल्ले उधळण्यासाठी युएई इस्रायलकडून हवाई सुरक्षा यंत्रणा खरेदी करणार आहे. ‘रफायल’ या इस्रायली कंपनीच्या ‘स्पायडर’ प्रगत हवाई सुरक्षा यंत्रणेने युएई सज्ज होणार असल्याची माहिती समोर येत आहे. इस्रायल सरकारने सदर सहकार्याला मंजुरी दिली आहे.

गेल्या वर्षी दुबई येथे पार पडलेल्या ‘आयडीईएक्स 2021’ या संरक्षण साहित्यांच्या प्रदर्शनावेळी इस्रायलने स्पायडर यंत्रणा अरब देशांसमोर प्रदर्शनाला ठेवली होती. त्याचवेळी इस्रायल आणि युएईच्या अधिकाऱ्यांमध्ये स्पायडरच्या खरेदीबाबत चर्चा पार पडली. तर जानेवारी महिन्यात याबाबतच्या वाटाघाटी पार पडल्या होत्या. यानुसार, इस्रायली कंपनी लघू, मध्यम आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून बचाव करणारी ‘स्पायडर’ ही हवाई सुरक्षा यंत्रणा युएईला पुरविणार आहे. येमेनमधील हौथी बंडखोरांचे क्षेपणास्त्र तसेच ड्रोन्सचे हल्ले उधळण्यात स्पायडर यशस्वी ठरेल, असा दावा केला जातो.

दरम्यान, एप्रिल महिन्यात युएईच्या आठ ग्लोबमास्टर विमाने इस्रायलमध्ये उतरली होती. किमान तासाभराच्या विश्रांतीनंतर युएईची विमाने मायदेशी रवाना झाली होती. या विमानांच्या इस्रायल प्रवासाबाबत दोन्ही देशांनी कुठलेही तपशील देण्याचे टाळले आहेत.

leave a reply