अफगाणिस्तानातल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये ५९ जणांचा बळी

काबूल – मंगळवारी अफगाणिस्तानमध्ये झालेल्या भीषण दहशतवादी आणि आत्मघाती हल्ल्यांमध्ये ५९ जणांचा बळी गेला आहे. या हल्ल्यांमधील जखमींची प्रकृती चिंताजनक असून यामुळे बळींची संख्या वाढण्याची भिती व्यक्त केली जाते. तालिबानने या हल्ल्यांची जबाबदारी नाकारली आहे. मात्र अफगाणिस्तानच्या सरकारने यासाठी तालिबानला जबाबदार धरून अफगाणी लष्कराला तालिबानवरील हल्ले तीव्र करण्याचे आदेश दिले आहेत. ‘ राष्ट्राध्यक्ष गनी युद्ध पुकारत आहे, तालिबान त्याला जोरदार प्रत्त्युत्तर दिल्यावाचून राहणार नाही’, असा इशारा तालिबानने दिला आहे. याला काही तास उलटत नाही तोच अफगाणी लष्कराने बल्ख प्रांतात हवाई हल्ले चढवून ३६ तालिबानी दहशतवाद्यांना ठार केल्याची बातमी आली आहे.

मंगळवारी लष्करी गणवेशात आलेल्या हल्लेखोरांनी काबूलच्या एका हॉस्पिटलला लक्ष्य केले. सुरुवातीला या हॉस्पिटलच्या आवारात स्फोट झाले. त्यानंतर हल्लेखोरांनी गोळीबार सुरु केला. अफगाणी लष्कर आणि पोलिसांनी तात्काळ त्याला प्रत्युतर दिले. यात ३४ जणांचा बळी गेला असून यामध्ये नवजात बालके आणि त्यांच्या मातांचा समावेश आहे. माणुसकीला काळिमा फासणार्‍या या भ्याड हल्ल्याचे फोटोग्राफ्स माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत . याला काही तास उलटत नाही तोच अफगाणिस्तान आणखी एका हल्ल्याने हादरला.

अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतात आत्मघाती हल्ला घडविण्यात आला. एका पोलीस कमांडरची अंतिम यात्रा सुरु होती. याला प्रचंड गर्दी झाली होती. या गर्दीला आत्मघाती हल्लेखोरांनी लक्ष्य केले. यावेळी घडविलेल्या स्फोटात २५ जण ठार झाले असून ७० हून अधिक जण जखमी झाले आहे. या हल्ल्याची जबाबदारी ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेने स्वीकारल्याचे अफगाणी माध्यमांनी सांगितले. या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांची संतप्त प्रतिक्रिया उमटली. राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांना तालिबानवर भीषण हल्ले करण्याचे आदेश दिले.

अफगाणिस्तानमधील हे दोन हल्ले भयंकर असून ते कधीही दुर्लक्ष करता येणार नाही. हे सैतानी प्रवृत्तीचे काम असल्याचे सांगून अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी या हल्ल्यांची तीव्र शब्दात निर्भत्सना केली. तर भारताने हे हल्ले भयंकर असल्याचे सांगून याचा तीव्र शब्दात निषेध केला. हा हल्ला मानवतेच्या विरोधात असल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.

दरम्यान, रविवारी देखील अफगाणिस्तानमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले. सुदैवाने या हल्ल्यात जीवितहानी झाली नाही. अमेरिका आणि तालिबानमध्ये शांतीकरार पार पडल्यानंतर, तालिबानचे अफगाणिस्तानातील हल्ले कमी होण्याऐवजी वाढले आहेत. यामुळे शांतीकरार धोक्यात आला आहे.

leave a reply