भारतीय औषधांच्या आयातीची चौकशी पाकिस्तानवर उलटली

इस्लामाबाद – भारताने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० काढून घेतल्यानंतर तिळपापड झालेल्या पाकिस्तानने भारताबरोबरचा व्यापार बंद करून टाकला होता. मात्र अजूनही पाकिस्तान मोठ्या प्रमाणात भारताकडून औषधांची आयात करीत असल्याची बाब नुकतीच उघड झाली होती. यानंतर धक्का बसलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. पण आता पाकिस्तानच्या औषध निर्मिती कंपन्यांनी यासंदर्भात दिलेल्या खुलासानंतर ही चौकशी पाकिस्तानच्या सरकारवरच उलटत असल्याचे समोर येत आहे.

कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांवरील औषधे भारतातून मागवण्याची परवानगी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी दिली होती. पण याच्याबरोबरीने अनावश्यक औषधे देखील भारतातून मागविले जात आहेत, अशी तक्रार पुढे आल्यानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. पाकिस्तानच्या माध्यमांनी ही बाब उचलून धरली होती. यानंतर पाकिस्तानच्या आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांनी दिलेली माहिती पाकिस्तानच्या सरकारचे डोळे उघडणारी ठरत आहे . पाकिस्तान भारताकडून मागवीत असलेली बरीचशी औषधे केवळ भारतातच तयार होतात. या आघाडीवर भारताला पर्याय शोधायचा झाल्यास पाकिस्तानला खूपच पैसे खर्च करावे लागतील, याची जाणीव पाकिस्तानच्या औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी करून दिली.

भारताने काश्मीरबाबत निर्णय घेतल्यानंतर या क्षेत्रातील पाकिस्तानी कंपन्यांनी भारतावरील निर्भरता कमी करण्याचा प्रयत्न केला होता. भारताकडून येणाऱ्या कच्चा मालाची खरेदी १५ ते २० टक्क्यांनी कमी केली होती व याची चीनकडून आयात सुरू केली होती. पण चीनला कोरोनाव्हायरसने ग्रासल्यानंतर पाकिस्तानला पुन्हा भारताकडून कच्चामाल मागवावा लागला होता. याकडे पाकिस्तानी कंपन्यांनी लक्ष वेधले आहे. तसेच कोरोनाव्हायरस फैलावत असताना देखील पाकिस्तानात औषधांचा तुटवडा जाणवला नाही. त्याचा काळाबाजार झाला नाही, याचे कारण भारतातून अव्याहतपणे होत असणारी औषधे व कच्च्या मालाचा पुरवठा हेच असल्याचेही पाकिस्तानी कंपन्यांनी लक्षात आणून दिले आहे. आता या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देणाऱ्या पाकिस्तानच्या सरकारनेच जीवन रक्षक औषधे भारताकडून मागण्याची परवानगी दिली होती.

स्वतः पंतप्रधान इम्रान खान यांनी त्याला मान्यता दिली होती, हेही आता स्पष्ट झाले आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानच्या सरकारने देशावर कोरोनाचे संकट आलेले असताना भारताकडून औषधे व त्यासाठी लागणारा कच्चामाल याचे आयात थांबू नये, अशी कळकळीची मागणी ही पाकिस्तानच्या औषध निर्मिती क्षेत्रातील कंपन्या करीत आहेत. यामुळे दररोज भारताच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानातील भारतद्वेष्टींनाही आपल्या देशाला मिळणारी औषधे भारतातून येत असल्याची जाणीव झाली आहे. तसेच भारताच्या या औषधांना सध्यातरी आपल्याकडे पर्याय नसल्याची जाणीव झाली आहे. याबरोबरच आपणच दिलेल्या आदेशानुसार केल्या जाणाऱ्या आयातीची चौकशी करण्याचे आदेश देणाऱ्या पाकिस्तानच्या सरकारचे यामुळे हसे झाले आहे.

leave a reply