बलोचिस्तानमधील हल्ल्यात पाकिस्तानचे सात जवान ठार

इस्लामाबाद – बलोचिस्तानात दोन वेगळ्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानच्या लष्कराचे सात जवान ठार झाले. सोमवारी रात्री पीर गालिब भागात आयईडी स्फोट घडविण्यात आला, तर मांड भागात पाकिस्तानी लष्कर व बंडखोरांमध्ये चकमक उडाली. पीर गालिबमध्ये झालेल्या स्फोटाची जबाबदारी कुठल्याही संघटनेने स्वीकारलेली नाही तरी ‘दि बलोच लिबरेेशन आर्मी’ या संघटनेेेेवर संशय व्यक्त केला जातो. आठवड्यापूर्वी याच भागात झालेल्या स्फोटाची जबाबदारी ‘दि बलोच लिबरेेशन आर्मी’ने स्वीकारली होती.

सोमवारी रात्री बलोचिस्तानच्या बोलन जिल्ह्यातील पीर गालिब भागात पाकिस्तानी लष्कराचे जवान वाहनाने परत येत असताना हा स्फोट झाला. यामध्ये सहा जवान ठार झाले आणि चार जवान जखमी झाले. जखमींना क्वेटामधल्या रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती बोलनच्या उपआयुक्तांनी दिली. हा स्फोट झाल्यानंतर काही तासातच मांडमध्ये पाकिस्तानी लष्कर आणि बंडखोरांची चकमक उडाली. यात लष्कराचा एक जवान ठार झाला.

याआधी ९ मे रोजी अफगाणिस्तान व इराणच्या सीमेजवळच्या भागात झालेल्या स्फोटात एका मेजरसह पाकिस्तानचे सहा जवान ठार झाले होते आणि या हल्ल्याची जबाबदारी ‘दि बलोच लिबरेेशन आर्मी’ने स्वीकारली होती. पाकिस्तानचे लष्कर बलोचिस्तानच्या जनतेवर अत्याचार करीत आहे. या अन्यायाच्या विरोधात बलोच बंडखोर संघटनांनी संघर्ष पुकारला असून पाकिस्तानी लष्कराला धडा शिकविण्यासाठी पाकिस्तानी लष्कराच्या जवानांवर जोरदार हल्ले सुरू केले आहेत. सोमवारी झालेले हल्ले याचाच भाग होते.

leave a reply