इराणशी सहकार्य करणाऱ्या चिनी कंपनीवर अमेरिकेचे निर्बंध

वॉशिंग्टन, (वृत्तसंस्था) – अमेरिकेने ब्लॅकलिस्ट केलेल्या इराणच्या विमान कंपनीशी सहकार्य करणाऱ्या चिनी कंपनीवर अमेरिकेच्या कोषागार विभागाने निर्बंध घातले आहेत. यापुढेही चिनी कंपनीने इराणशी सहकार्य सुरू ठेवले तर अधिक कठोर निर्बंध लादण्याचा इशारा अमेरिकेने दिला आहे.

अमेरिकेने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेल्या इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्डस्’चे समर्थन केल्याप्रकरणी २०११ साली अमेरिकेने इराणच्या ‘महन एअर’ या प्रवासी विमान कंपनीवर निर्बंध लादले होते. सिरियातील संघर्षात दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रे पुरविल्याचा ठपका  ठेवून  अमेरिकेने इराणच्या प्रवासी विमान कंपनीवर निर्बंध जाहीर केले होते. इराणच्या विमान कंपनीने सिरियामध्ये सर्वसंहारक शस्त्रास्त्रे उतरविण्याचा ठपका अमेरिकेने ठेवला होता.

या निर्बंधानुसार, इराणच्या महन एअरशी सहकार्य करणाऱ्या कुठल्याही देशाच्या कंपनीवर निर्बंध लादण्याचा इशारा अमेरिकेने याआधीच दिला होता. तरीही, हा इशारा झुगारुन चीनच्या ‘शांघाई सेंट लॉजिस्टिक लिमिटेड’ या कंपनीने इराणच्या महन एअरसाठी ‘जनरल सेल्स एजंट’ (जीएसए) म्हणून काम केले, असा आरोप अमेरिकेच्या कोषागार विभागाने केला आहे. याबरोबरच चीन इराणच्या विमान कंपनीमार्फत व्हेनेझुएलामधील मदुरो यांच्या राजवटीला सहाय्य करीत असल्याचा आरोपही अमेरिकेने केला आहे.

अमेरिकेची चीनविषयक भूमिका अधिकाधिक आक्रमक बनत चालले असून चिनी कंपनीवर निर्बंधाची घोषणा करण्यासाठी अमेरिकेच्या कोषागार विभागाने निवडलेली वेळ लक्षवेधी ठरते आहे. चीनने कोरोनाव्हायरसची माहिती दडवून  अमेरिकेसह साऱ्या जगाला संकटाच्या खाईत लोटल्याचा आरोप अमेरिका करीत आहे. तसेच  या भयंकर चुकीची जबर नुकसान भरपाई चीनकडून वसूल करायलाच हवी, अशी मागणी अमेरिका करू लागली आहे. अमेरिकेच्या या मागणीला काही देशांकडून दुजोरा मिळू लागला आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेने सर्वच स्तरांवरून  चीनवरील दडपण वाढविण्याचे सत्र सुरू केले आहेत. चिनी कंपनीवर अमेरिकेच्या कोषागार विभागाने लादलेले निर्बंध देखील अमेरिकेच्या या व्यापक योजनेचा भाग ठरतो.  

leave a reply