श्रीनगरमधील चकमकीत ‘हिजबुल’चा कमांडर ठार

जम्मू – जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये सुरक्षादलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर जुनैद सेहराई सह दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच हिजबुल मुजाहिदीन’चा कमांडर रियाज नायकूला चकमकीत ठार मारण्यात आले होते. त्यानंतर आता जुनैदला ठार मारण्यात आल्याने ‘हिजबुल’ला मोठा हादरा बसला आहे. सुमारे दोन वर्षानंतर श्रीनगरमध्ये पहिल्यांदा चकमक उडाली.

सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफने श्रीनगरच्या दाट लोकसवस्तीचा भाग असलेल्या नवाकदल परिसरात दहशतवाद्यांविरोधात शोधमोहिम हाती घेतली होती. सुरक्षादलांच्या जवानांनी दहशतवादी लपून असलेल्या भागाला वेढा दिला. सुरक्षादलाच्या जवानांनी घेरल्याचे लक्षात येताच दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. या चकमकीत जुनैद सेहराई या हिजबुलचा दुसऱ्या फळीतील दहशतवाद्याला ठार मारण्यात आले. जुनैद नायकूनंतरचा दुसरा मोठा दहशतवादी आहे. जुनैद हा फुटीर संघटना तेहरीक-ए-हुर्रियतचा अध्यक्ष अशरफ सेहराईचा मुलगा होता, अशी माहिती समोर येते.

मूळचा श्रीनगरमधील असलेला जुनैद मार्च २०१८ मध्ये दहशतवादी संघटनेत सहभागी झाला होता. जुनैद हा विभागीय कमांडर होता. जुनैद हा श्रीनगर, बुडगाम, पुलवामा आणि शोपियनमध्ये सक्रिय होता. सुरक्षादलावर हल्ले करणे, नागरिकांना धमकी देण्यात जुनैदचा सहभाग होता. या चकमकीत तारिक शेख या दहशतवाद्याला देखील ठार मारण्यात आले. मार्च महिन्यातच तारिक दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. तारिक हा पुलवामाचा रहिवासी होता अशी माहिती पोलिस महासंचालक (डीजीपी) दिलबग सिंग यांनी दिली.

गेले काही महिने सुरक्षादलांकडून जुनैदचा शोध सुरु होता. तो श्रीनगरच्या नवाकदल परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर या भागात कारवाई हाती घेण्यात आली असे सिंग म्हणाले. नायकूला ठार मारण्यात आल्यानंतर जुनैदला ठार मारण्यात आल्याने सुरक्षादलाला मिळालेले हे मोठे यश असल्याचे म्हटले जाते. श्रीनगरमध्ये दहशतवाद्याचे अस्तित्व आढळल्याने दहशतवादी या भागात पुन्हा एकत्र येत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. श्रीनगरमध्ये दहशतवादी एकवटणे हे चिंतेची बाब ठरू शकते. या चकमकीनंतर राज्यातील इंटरनेट आणि मोबाईल व बीएसएनलची सेवा पुन्हा बंद करण्यात आली आहे. या भागात शोध मोहीम अद्याप सुरु असल्याचे सांगण्यात येते.

ऑक्टोबर २०१८ मध्ये श्रीनगरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षादलाच्या जवानांमध्ये चकमक उडाली होती. या चकमकीत लश्कर-ए-तोयबाचा कमांडर मेहराज-उद-बद्दीन बंगरू याला ठार मारण्यात आले होते. त्यानंतर आता दोन वर्षांनी श्रीनगरमध्ये चकमक झाली आहे.

leave a reply