नायजेरियातील वांशिक संघर्षात 74 जणांचा बळी

वायव्य नायजेरियात 80 जणांचे अपहरण

nigeria attackमैदुगरी – नायजेरियातील बेनु प्रांतात झालेल्या हिंसाचारात 74 जणांचा बळी गेला आहे. स्थानिक सुरक्षायंत्रणांनी हा वांशिक हत्याकांडाचा भाग असल्याचा दावा केला आहे. एकाच प्रांतातील दोन वेगवेगळ्या भागांमध्ये भटक्या जमातींशी संबंधित सशस्त्र गटांनी हल्ले चढविल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, वायव्य नायजेरियातील झम्फारा प्रांतात दहशतवादी गटाने तब्बल 80 जणांचे अपहरण केले असून सुटकेसाठी तीन कोटी नायरा (स्थानिक चलन) इतकी खंडणी मागितल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे.

नायजेरिया हा आफ्रिकेतील इंधनसंपन्न देशांपैकी एक म्हणून ओळखण्यात येतो. आफ्रिका खंडातील आघाडीच्या अर्थव्यवस्थांमध्ये समावेश होणाऱ्या या देशात नुकत्याच राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडल्या होत्या. या निवडणुकांमध्ये स्थैर्य व सुरक्षा हा प्रमुख मुद्दा होता. मात्र वांशिक संघर्ष व दहशतवादी हल्ल्यांच्या सावटाखाली या निवडणुकीत अवघे 27 टक्के मतदान झाले होते. नवे राष्ट्राध्यक्ष बोला तिनुबु यांनी सर्व देशातील सर्व नागरिकांना सुरक्षेचे आश्वासन दिले होते. मात्र हिंसाचार व अपहरणाच्या नव्या घटनांमुळे ते फोल ठरल्याचे दिसत आहे.

Armed-Fulani-herdsmenगेल्या आठवड्यात मध्य नायजेरियातील बेनु प्रांतात उमोगिदि भागात सशस्त्र गटाने गावातील शेतकऱ्यांवर जोरदार हल्ला चढविला. या हल्ल्यात जवळपास 46 जणांचा बळी गेल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली. हल्लेखोर भटक्या जमातींचा समावेश असलेल्या बंडखोर गटांशी संबंधित होते, असे सुरक्षा अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. शेतकरी व भटक्या जमातींमध्ये जमीन तसेच पाण्यावरून असलेल्या वादातून हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येते. काही अधिकाऱ्यांनी हा वांशिक हत्याकांडाचा भाग असावा, अशी भीती व्यक्त केली आहे.

या हल्ल्यापाठोपाठ एम्गबन भागातील स्थलांतरितांच्या छावणीत राहणाऱ्या शेतकऱ्यांवर हल्ला करण्यात आला. यात किमान 28 जणांचा बळी गेला असून अनेक जण जखमी आहेत. हल्लेखोर भटक्या जमातींमधील फुलानी वंशाचे होते, असा आरोप गावकऱ्यांनी केला. यापूर्वी झालेल्या हिंसक घटनांमुळे शेतकऱ्यांवर विस्थापित होण्याची वेळ ओढवली होती. सरकारने त्यांना स्थलांतरितांच्या छावणीत जागा उपलब्ध करून दिली होती. या छावणीला सरकारकडून सुरक्षाही पुरविण्यात आली आहे. मात्र तरीही हल्ला झाल्याने सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

NIGERIA-BENUEएकापाठोपाठ झालेल्या या हल्ल्यांनंतर देशाच्या वायव्य भागातील झम्फारा प्रांतात अपहरणाची घटना घडली आहे. शुक्रवारी वान्झामाई गावात मुले व स्त्रिया शेतात काम करीत असताना ही घटना घडली. गाड्यांमधून आलेल्या दहशतवाद्यांनी शेतावर काम करणाऱ्या स्त्रिया व मुलांना घेरले व त्यांचे अपहरण केल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. जवळपास 80 जणांचे अपहरण झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दहशतवादी गटाकडून तीन कोटी नायरा(स्थानिक चलन) इतक्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे.

आफ्रिकेतील आघाडीच्या देशांपैकी एक असलेल्या नायजेरियात गेल्या दशकभरात हिंसक घटनांचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. अल कायदा व ‘आयएस’शी संबंधित दहशतवादी गट, सरकारविरोधी बंडखोर गट, सशस्त्र वांशिक गट तसेच दरोडेखोरांच्या टोळ्यांकडून सातत्याने हल्ले व अपहरणाच्या घटना घडत आहेत. यामुळे नायजेरियात प्रचंड अस्थैर्य असून लष्कर तसेच सुरक्षाव्यवस्था वाढवूनही यात फरक पडलेला नसल्याचे नव्या घटनांवरून दिसून येत आहे.

हिंदी

leave a reply