इराणबरोबर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेची आण्विक पाणबुडी आखातात तैनात

वॉशिंग्टन – 154 टॉमाहॉक क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेली ‘युएसएस फ्लोरिडा’ ही आण्विक पाणबुडी आखातात तैनात केल्याची घोषणा अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनने केली. गेल्या काही दिवसांपासून इराणबरोबर वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने ही तैनाती केल्याचा दावा केला जातो. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने इराणचा धोका अधोरेखित करून सिरियाच्या किनारपट्टीजवळ आपली विनाशिका तैनात केली होती. त्यामुळे अवघ्या आठवड्याभरात अमेरिकेने इराणच्या विरोधात ही दुसरी तैनाती केल्याचे लष्करी विश्लेषकांचे म्हणणे आहे.

us floridaअमेरिका किंवा जगातील कुठलाही देश कधीही आपल्या पाणबुड्यांचे ठिकाण किंवा तैनाती जाहीर करीत नाही. कारण पाणबुडी ही नौदलाच्या ताफ्यातील छुपे शस्त्र म्हणून ओळखले जाते. अमेरिकेच्या नौदलाने देखील आत्तापर्यंत हीच भूमिका स्वीकारली होती. पण शनिवारी अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनने ओहियो श्रेणीतील ‘युएसएस फ्लोरिडा’ हा आण्विक पाणबुडीच्या तैनातीची दुर्मीळ घोषणा केली. अमेरिकेच्या पाचव्या आरमारातील ही पाणबुडी शुक्रवारी सुएझ कालवा ओलांडून पर्शियन आखाताच्या दिशेने रवाना झाल्याचे पेंटॅगॉनने सांगितले.

बाहरिनस्थित अमेरिकेच्या पाचव्या आरमारात ही पाणबुडी सामील होईल. आखातातील सुरक्षा आणि स्थैर्य अबाधित राखण्यासाठी या पाणबुडीची तैनाती केल्याचे पाचव्या आरमाराचे प्रवक्ते कमांडर टिमोथी हॉकिन्स यांनी सांगितले. जमिनीवर मारा करणारी 154 टॉमाहॉक क्षेपणास्त्रे या पाणबुडीत असल्याची माहिती कमांडर टिमोथी यांनीच दिली. या पाणबुडीच्या तैनातीचा उल्लेख करताना पेंटॅगॉन किंवा पाचव्या आरमाराने थेट इराणचा उल्लेख करण्याचे टाळले. पण पर्शियन आखातात ही पाणबुडी तैनात करून अमेरिका सामर्थ्य प्रदर्शन करीत असल्याचा दावा लष्करी विश्लेषक करीत आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून इराण व इराणसंलग्न दहशतवादी संघटनांनी सिरियातील अमेरिकेच्या लष्करावर केलेल्या हल्ल्यांकडे विश्लेषक लक्ष वेधत आहेत. सिरियातील अमेरिकेच्या लष्करी तळांवर झालेल्या ड्रोन हल्ल्यांमध्ये एका कंत्राटदाराचा बळी गेला तर अमेरिकी जवान व स्थानिक जखमी झाले होते. हे ड्रोन इराणी बनावटीचे असल्याचा आरोप करून इराणसंलग्न दहशतवाद्यांनी हे हल्ले चढविल्याचा ठपका अमेरिकेने ठेवला होता. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी अमेरिकेने सिरियाच्या किनारपट्टीजवळ विनाशिका तैनात केली होती. तर पर्शियन आखातातील परदेशी इंधनवाहू जहाजांवरील इराणचे हल्ले रोखण्यासाठी आण्विक पाणबुडीची ही तैनाती केल्याचा दावा केला जातो.

हिंदी

leave a reply