हिजबुलचा म्होरक्या सलाउद्दीन ‘आयएसआय’चा ‘मान्यताप्राप्त’ अधिकारी

नवी दिल्ली – हिजबुल मुजाहिदचा म्होरक्या सय्यद सलाउद्दीन आणि पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’ यांच्यातील संबंध पुन्हा एकदा पुराव्यानिशी जगासमोर आला आहे. पाकिस्तानातील वरिष्ठ नेते आणि अधिकार्‍यांप्रमाणे ‘आयएसआय’कडून सय्यद सलाउद्दीनला सुरक्षा पुरविली जाते व सवलती दिल्या जातात. ही बाब भारतीय सुरक्षा यंत्रणेच्या हाती लागलेल्या पाकिस्तानी कागदपत्रामुळे समोर आली आहे. पुढच्याच महिन्यात ‘फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स’ची (एफएटीएफ) बैठक पार पडणार आहे. याआधी उघड झालेली ही माहिती पाकिस्तानला ‘एफएटीएफ’च्या काळ्या यादीत ढकलण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते.

hezbollahगेल्या काही वर्षांपासून जम्मू आणि काश्मीरमध्ये हिजबुलचे दहशतवादी नेटवर्क सक्रीय होते. पण सुरक्षादलांच्या बेधडक कारवायांमुळे हिजबुलचे हे नेटवर्क उध्दवस्त झाले होते. पण आता हीच हिजबुल पाकिस्तान व्याप्त काश्मीरच्या तळावर नव्याने हालचाली वाढवित असल्याची माहिती समोर येत आहे. भारतीय लष्कर एकाचवेळी ‘लाईन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोल’वर (एलएसी) चीनसोबत आणि ‘लाईन ऑफ कंट्रोल’वर (एलओसी) पाकिस्तानशी लढत आहे. याचा फायदा घेऊन हिजबुल काश्मीरमध्ये आपले नेटवर्क उभारु शकते, असा दावा भारतीय लष्कराने केला. त्याचवेळी हिजबुलचा म्होरक्या सलाउद्दीनचे पाकिस्तानच्या ‘आयएसआय‘ सोबतचे लागेबांधे उघड झाले आहेत.

भारतीय सुरक्षा यंत्रणाना मिळालेल्या कागदपत्रावरुन सलाउद्दीन ‘आयएसआय’चा मान्यताप्राप्त अधिकारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘आयएसआय’चे कमांडींग अधिकारी वहाजत अली खान यांनी हे कागदपत्र जारी केले. या कागदपत्रावर सलाउद्दीनचे नाव, वाहन क्रमांक असून या कागदपत्राच्या आधारे सलाउद्दीनला ‘सिक्युरिटी क्लिअरन्स’ देण्यात आला आहे व पाकिस्तानची सुरक्षायंत्रणा त्याला अडवू शकत नाही. राजकीय नेता किंवा सनदी अधिकारी किंवा लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्‍याप्रमाणे मोस्ट वाँटेड दहशतवादी सलाउद्दीनला पाकिस्तानात सुरक्षा पुरविली जात आहे. इस्लामाबादमधील ‘डायरेक्टरेट ऑफ इंटलिजन्स’च्या कार्यालयाने जारी केलेल्या या कागदपत्राची ३० डिसेंबर २०२० पर्यंतची वैधता आहे.

पुढच्या महिन्यात ‘एफएटीएफ’ची बैठक होणार आहे. या बैठकीच्या आधी ‘आयएसाआय’ आणि सलाउद्दीनमधील साटेलोटे सांगणारे हे कागदपत्रे जगासमोर आल्याने पाकिस्तान चांगलाच कात्रीत सापडला आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान इम्रान खान यांनी ‘एफएटीएफ’च्या काळ्या यादीत पाकिस्तानचा समावेश झाला तर पाकिस्तानची अवस्था इराणपेक्षाही वाईट होईल, अशी चिंता व्यक्त केली होती. तसेच यामुळे पाकिस्तानात महागाईचा आगडोंब उसळेल आणि उरलीसुरलेली अर्थव्यवस्था कोसळेल, याची भिती इम्रान खान यांनी व्यक्त केली होती. भारत पाकिस्तानला ‘एफएटीएफ’च्या काळ्या यादीत टाकण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करीत असल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला होता.

leave a reply