क्रिप्टो क्षेत्रातील 99 टक्के करन्सी हा घोटाळ्याचा भाग

अमेरिकी अर्थतज्ज्ञ नुरिअल रुबिनी यांचा इशारा

Cryptocurrency-Scamडॅव्होस – ‘सध्या अस्तित्वात असलेल्या क्रिप्टोकरन्सीमधील 99 टक्के हिस्सा निव्वळ फसवणूक व घोटाळ्याचा भाग आहे. क्रिप्टोकरन्सी म्हणजे गुन्हेगारी कृत्य आहे. क्रिप्टोकरन्सी म्हणजे फसव्या आर्थिक योजनांचा बुडबुडा असून लवकरच तो फुटणार आहे’, असा गंभीर इशारा अमेरिकेतील आघाडीचे अर्थतज्ज्ञ नुरिअल रुबिनी यांनी दिला. युरोपच्या डॅव्होसमध्ये सुरू असणाऱ्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या पार्श्वभूमीवर दिलेल्या एका मुलाखतीत रुबिनी यांनी क्रिप्टोक्षेत्रावर घणाघाती टीका केली. काही दिवसांपूर्वीच अमेरिकी अर्थतज्ज्ञ व गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी, क्रिप्टोकरन्सी लवकरच नामशेष होण्याच्या मार्गावर आहे असे बजावले होते. अमेरिकेतील न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीत ‘प्रोफेसर एमेरिटस’ पदावर असणारे रुबिनी जगातील आघाडीच्या अर्थतज्ज्ञांपैकी एक म्हणून ओळखण्यात येतात. नुरिअल रुबिनी यांनी यापूर्वी 2008-09 साली आलेल्या महामंदीचे योग्य भाकित वर्तविले होते. त्यामुळे ते ‘डॉक्टर डूम’ या उपाधीने प्रसिद्ध आहेत. अमेरिकेत ओबामा प्रशासनाच्या काळात आर्थिक सल्लागार म्हणून काम केलेले रुबिनी क्रिप्टोकरन्सीचे कडवे विरोधक व टीकाकार म्हणूनही प्रसिद्ध आहेत. यापूर्वीही त्यांनी ‘बिटकॉईन’सह इतर क्रिप्टोकरन्सींवर जोरदार कोरडे ओढले होते.

roubini wef crypto‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या पार्श्वभूमीवर दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ‘एफटीएक्स’ घोटाळ्याचा संदर्भ देत क्रिप्टोकरन्सी क्षेत्राला धारेवर धरले. ‘एफटीएक्स व त्याचा मालक सॅम बँकमन फ्राईड हे अपवाद नाहीत तर नियमच आहे. फक्त अमेरिकेत एफटीएक्सचे 10 लाख ग्राहक आहेत. एफटीएक्स अपयशी ठरुन कोसळण्याची घटना बर्नी मॅडॉफ याच्या फसव्या आर्थिक योजनांप्रमाणेच आहे. मात्र मॅडॉफ यांच्या घोटाळ्यात काही हजार जणांचेच नुकसान झाले होते, तर एफटीएक्समुळे लक्षावधी जणांना मोठा फटका बसला आहे’, याची जाणीव रुबिनी यांनी करून दिली.

एफटीएक्सचा मुद्दा पुढे नेताना सर्वांनी क्रिप्टोतील गुंतवणुकीपासून दूरच रहायला हवे, असा सावधगिरीचा सल्लाही अमेरिकी अर्थतज्ज्ञांनी दिला. क्रिप्टो क्षेत्रातील सर्वजण पक्के बदमाश असून त्या सर्वांची जागा तुरुंगात असल्याचेही रुबिनी यांनी बजावले. यावेळी त्यांनी क्रिप्टोकरन्सीमागे असणाऱ्या ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानावरही खरमरीत टीका केली. ‘ब्लॉकचेन’ हे फक्त एक नाव असून प्रत्यक्षात तो अवास्तव महत्त्व व वलय दिलेला ‘डेटाबेस’चा प्रकार असल्याचा दावा रुबिनी यांनी केला.

crypto sectorब्लॉकचेन हे अल्पकाळासाठी तयार झालेले फॅड असून प्रचंड ऊर्जा फुकट घालविणारे निरुपयोगी तंत्रज्ञान आहे, या शब्दात नुरिअल रुबिनी यांनी फटकारले. ‘ब्लॉकचेन’चे वास्तव व उपयोग जाणून घ्यायचे असेल तर त्याचा वापर बहुराष्ट्रीय कंपनीच्या जागतिक पुरवठा साखळीत करुन बघायला हवा, असाही दावा त्यांनी यावेळी केला. गेल्या दोन वर्षात क्रिप्टोकरन्सी क्षेत्रातील अनेक घोटाळे समोर आले असून वेगवेगळ्या प्रकारच्या ‘टोकन्स’सह (कॉईन्स) अनेक कंपन्यांनी दिवसाळखोरी जाहीर करीत गाशा गुंडाळला आहे. काही टोकन्स व कंपन्यांमधील गुंतवणूक पूर्णपणे गायब झाली असून कोट्यावधी लोकांना त्याचा फटका बसला आहे. क्रिप्टोतील गुंतवणुकीमुळे अब्जावधी डॉलर्स पूर्णपणे बुडाल्याचे समोर आले आहे.

या पार्श्वभूमीवर जगातील आघाडीच्या मध्यवर्ती बँकांसह अर्थतज्ज्ञ तसेच गुंतवणुकदारांनी क्रिप्टोकरन्सीमधील धोक्यांबाबत सातत्याने इशारे देण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतील आघाडीच्या बँकेनेही क्रिप्टोतील व्यवहारांवरून ॲलर्ट जारी केला होता. त्यानंतर आता रुबिनी यांच्यासारख्या आघाडीच्या अर्थतज्ज्ञाने त्याची तुलना घोटाळ्याशी करून सावधगिरी बाळगण्याबाबत बजावले आहे.

leave a reply