इराणच्या सीमेतून झालेल्या हल्ल्यात चार पाकिस्तानी जवान ठार

अस्वस्थ पाकिस्तानकडून दहशतवाद्यांवर कारवाईची मागणी

Pak-Iran-borderइस्लामाबाद – पाकिस्तानच्या चुकाब सीमेजवळ गस्त घालणाऱ्या पाकिस्तानी जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चार जवानांचा बळी गेल्याचे पाकिस्तानने जाहीर केले. इराणच्या सीमेतून हा हल्ला झाल्याचा आरोप पाकिस्तान करीत आहे. त्याचबरोबर इराणने आपल्या देशातील दहशतवादी संघटनांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पाकिस्तानने केली आहे. दरम्यान, पंजगूरमधील या हल्ल्यात चार नाही तर सोळा जवानांचा बळी गेल्याचा दावा केला जातो.

इराणच्या सीमेजवळ असलेल्या पाकिस्तानच्या बलोचिस्तान प्रांतातील पंजगूर जिल्ह्यात जवानांची पेट्रोलिंग पार्टी गस्त घालत होती. त्यावेळी इराणच्या सीमेतून पाकिस्तानी जवानांच्या पथकावर जोरदार गोळीबार झाला. या हल्ल्याची जबाबदारी कुठल्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. पण इराण, पाकिस्तान आणि काही प्रमाणात अफगाणिस्तानात असलेल्या बलोचिस्तान प्रांताच्या स्वातंत्र्याची मागणी करणारी बलुच बंडखोर संघटना यामागे असल्याची शक्यता वर्तविण्यात येते.

iran pak border mapपाकिस्तानने बुधवारच्या या हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्या दहशतवाद्यांवर इराणने कठोर कारवाई करावी, अशी मागणी पाकिस्तानने केली आहे. तर इराणने देखील यासंधीचा फायदा घेत पाकिस्तानच्या सरकारला त्यांच्याच देशाच्या सीमेत दडून बसलेल्या आणि इराणच्या सिस्तान-बलुचिस्तानमध्ये हल्ले चढविणाऱ्या दहशतवादी संघटनांची आठवण करून दिली. पाकिस्तानने देखील आपल्या सीमेतील या दहशतवादी संघटनांवर कारवाई करावी, अशी मागणी इराणने केली.

पंजगूरच्या सीमेवर आपल्या जवानांवर झालेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तान हादरुन गेले आहे. गेल्या काही महिन्यांपासून अफगाणिस्तानबरोबरच्या ड्युरंड सीमेतून पाकिस्तानी लष्कराला लक्ष्य केले जात होते. तसेच तालिबानने येथील तारेचे कुंपणही उखडून टाकले होते. आपल्या पश्चिम सीमेच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानने मोठ्या प्रमाणात सैन्यतैनाती तसेच तोफा तैनात केल्याच्या बातम्या येत होत्या. त्यातच तेहरिक-ए-तालिबानचे दहशतवादी पाकिस्तानच्या खैबर-पख्तूनख्वा व जवळच्या भागावर नियंत्रण मिळवित आहेत. अशा परिस्थितीत, इराणच्या सीमेतून आपल्या जवानांवर हल्ले सुरू झाल्यामुळे पाकिस्तान हवालदिल झाला आहे.

leave a reply