अणुकार्यक्रम थांबविणे इराणसाठी बंधनकारक आहे

- सौदीच्या वरिष्ठ नेत्याची मागणी

अणुकार्यक्रम थांबविणेडावोस – ‘आंतरराष्ट्रीय समुदायाकडून आदर हवा असेल, त्यांचे सहकार्य आवश्यक असेल तर इराणने आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा आदर करून अणुकार्यक्रम थांबविणे बंधनकारक आहे. इराणने आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाच्या चौकटीत राहून अणुकार्यक्रम सुरू ठेवावा’, अशी मागणी सौदीच्या परराष्ट्र विभागाचे वरिष्ठ मंत्री अदेल अल-जुबैर यांनी केली.

इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे प्रमुख राफेल ग्रॉसी यांनी नुकतीच तीव्र चिंता व्यक्त केली होती. इराणने फोर्दो प्रकल्पातील युरेनियमचे संवर्धन 60 टक्के शुद्धतेपर्यंत नेले असून इराण यात वाढ करण्याच्या तयारीत असल्याचा दावा ग्रॉसी यांनी केला होता. इतक्या वेगाने युरेनियमचे संवर्धन वाढविल्यामुळे इराण अणुबॉम्ब निर्मितीच्या जवळ पोहोचत असल्याचे ग्रॉसी पुढे म्हणाले होते. अणुऊर्जा आयोगाच्या निरीक्षकांना अणुप्रकल्पाचे दरवाजे बंद केल्यामुळे इराणच्या अणुकार्यक्रमावरील संशय वाढल्याचेही ग्रॉसी म्हणाले होते.

अणुऊर्जा आयोगाच्या प्रमुखांचा हा इशारा इस्रायल तसेच सौदी अरेबिया व शेजारी अरब मित्रदेशांनी उचलून धरला होता. यानंतर ब्रिटन, फ्रान्स व जर्मनी या युरोपातील ‘ईथ्री’ देशांनी देखील ग्रॉसी यांचे आरोप इराणबरोबरच्या वाटाघाटींसाठी मारक ठरतील, अशी शक्यता वर्तविली होती. रशिया-युक्रेन युद्धामुळे सदर मुद्दा दुर्लक्षित झाला होता. तर या काळात इराणने देखील सौदीला चर्चेचा प्रस्ताव दिला होता. सौदीबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी उत्सुक असल्याचे इराणने म्हटले होते.

पण डावोस येथील बैठकीत सौदीच्या परराष्ट्र विभागाच्या वरिष्ठ नेत्यांनी अणुकार्यक्रमाचा मुद्दा उपस्थित करून इराणवरील दबाव वाढविला आहे. इराणला सौदी व इतर देशांचे सहकार्य हवे असेल तर अणुकार्यक्रम थांबविणे बंधनकारक असल्याचे जुबैर यांनी ठणकावून सांगितले. दरम्यान, इराण अण्वस्त्रसज्ज झालाच तर सौदी देखील फार काळ मागे राहणार नाही, असा इशारा सौदीने काही आठवड्यांपूर्वी दिला होता.

leave a reply