जगभरात चोवीस तासात कोरोनाचे ९९ हजार रुग्ण आढळले

ब्रुसेल्स/बर्लिन – कोरोनाव्हायरसमुळे गेल्या चोवीस तासात जगभरात पाच हजारांहून अधिक जणांचा बळी गेला असून एका दिवसात ९९ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. युरोपमध्ये या साथीचे सर्वाधिक १७,५९,६३० रुग्ण आहेत. शनिवारी वीस हाजारहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची यात भर पडली. असे असूनही युरोपमधील प्रमुख देशांनी आर्थिक कारणांमुळे लॉकडाउन मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. जर्मनीने तर कोरोनाची साथ फैलावत असताना, फुटबॉलचे सामने खेळविण्याची घोषणा केली आहे.

जगभरात कोरोनाव्हायरसचे एकूण ३,०९,७७० बळी गेले असून यामध्ये अमेरिकेतील ८८,५९८ तर युरोपमधील १,६१,३५५ बळींचा समावेश आहे. गेल्या चोवीस तासात अमेरिकेत या साथीने १,६८० जणांचा बळी घेतला. तर शनिवारी युरोपात या साथीमुळे १,६९६ जण दगावले असून यामध्ये ब्रिटनमधील ४६८, इटलीतील २४२, फ्रान्सच्या १०४ आणि स्पेनमधील १०२ बळींचा समावेश आहे. जर्मनीत गेल्या चोवीस तासात ७३ जणांचा बळी गेला आहे.

आपल्या देशातील कोरोनाच्या बळींच्या संख्येत घट झाल्याचा दावा युरोपिय देश करीत आहेत. असे असले तरी, गेल्या चार दिवसांमध्ये युरोपातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्याचे समोर येत आहे. ब्रिटनमध्ये एकाच दिवसात या साथीचे ३,४५० नवे रुग्ण आढळले आहेत. तर फ्रान्समध्ये ९३३, इटलीत ७८९, जर्मनीत ७२४ आणि स्पेनमध्ये ५१५ नव्या रुग्णांची नोंद एकाच दिवसात झाल्याची माहिती जॉन हॉप्किन्स विद्यापीठाने दिली. काही युरोपिय देशांनी लॉकडाउनचे नियम शिथिल केल्यानंतर ही वाढ झाल्याची नोंद या अमेरिकी विद्यापीठाने केली आहे.

अशा परिस्थितीतही युरोपिय देशांनी लॉकडाउनचे नियम शिथिल करणे किंवा पूर्णपणे काढून घेण्याचे निर्णय घेतले आहेत. इटलीने लॉकडाउनचे नियम शिथिल करण्याची गेल्या दहा दिवसातील तिसरी घोषणा केली. ग्रीसने पर्यटनाला चालना देण्यासाठी ५०० चौपाट्या खुले करण्याचे जाहीर केले आहे. तर दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर जर्मनीने देशातील फुटबॉल स्पर्धा सुरू करण्याचे घोषित केले आहे. स्पेनने याआधीच फुटबॉल सामन्यांना मंजुरी दिली असून काही आघाडीच्या संघांनी सरावही सुरू केला आहे. हंगेरी सोमवारपासून टप्प्याटप्प्याने लॉकडाउन मागे घेणार आहे. तर स्लोव्हाकियाने आपला देश कोरोनामुक्त झाल्याचे जाहीर केले आहे.

कोरोनाची साथ झपाट्याने वाढण्याचा धोका पत्करून युरोपीय देश लॉकडाऊन मागे घेत आहेत. त्यामागे आर्थिक कारण असल्याचे दिसते. युरोपीय देशांच्या अर्थव्यवस्था कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे प्रचंड दडपणाखाली आले असून, आपली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी लॉकडाऊन मागे घेणे भाग असल्याचे खुलासे, युरोपीय देशांकडून दिले जात आहेत. कोरोनाची साथ इतक्यात संपणार नाही, असा निर्वाळा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. त्यामुळे या साथीसोबतच जगण्याचे कौशल्य आपण आत्मसात करायला हवे, असा सल्ला काही अर्थतज्ञ देत आहेत. युरोपीय देश लॉकडाऊनबाबत घेत असलेल्या निर्णयामागे हा तर्क असल्याचे दिसते. मात्र, या निर्णयाचे भयंकर परिणाम लवकरच समोर येतील, असा इशारा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ देत आहेत.

leave a reply