१६० दिवसांनी आसामच्या तिनसुकियामधील तेल विहीरीची आग विझली

तिनसुकियादिसपूर – आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील बागजान गावात ‘ऑईल इंडिया लिमिटेड’ कंपनीच्या तेल विहीरीला लागलेली आग साडे पाच महिन्यानंतर विझविण्यात यश आले आहे. ही आग विझवण्याच्या प्रयत्नात अग्निशामक दलाच्या तीन जणांना प्राण गमवावे लागले होते. तर या भागात राहणाऱ्या तीन हजार रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे लागले होते.

तेल विहीरीची आग विझविण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात आहे. आता विहिरीत कोणताही दाब नसून विहरीत अजून कोणती गळती होत आहे का याचे निरीक्षण केले जात आहे. सिंगापुरच्या ॲलर्ट डिझास्टर या कंपनीचे तज्ज्ञ यावर काम करीत आहेत, अशी माहिती ऑईल इंडिया लिमिटेडचे प्रवक्ते त्रिदिव हजारिका यांनी दिली आहे.

तिनसुकिया२७ मे रोजी या तेल विहीरीचा स्फोट होऊन वायू गळती सुरू झाली. आणि ९ जून रोजी संध्याकाळी अचानक या विहीरीला आग लागली. या आगीच्या ज्वाला दीड किलोमीटर परिसरापर्यंत पसरल्या होत्या. अग्निशामक दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू केले. पण आग विझवित असताना तीन जवानांना प्राण गमवावे लागले.

तिनसुकिया

आत्तापर्यंत या आगीत एकूण ४६,७८६ मेट्रिक टन कच्चे तेल आणि १२४.१५ मिलियन मेट्रिक स्टॅंडर्ड क्यूबिक मीटर गॅसचे नुकसान झाले होते. या आगीमुळे ऑईल इंडिया कंपनीने तीन हजारांहून अधिक रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविले होते. या आगीत घर गमावलेल्या १२ कुटुंबियांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची भरपाई देण्यात आली. छावण्यांमध्ये ज्या रहिवाशांना राहण्यास भाग पाडले, त्यांच्या खर्चासाठी ऑईल इंडिया कंपनी दरमहा ५० हजारांची मदत देत आहे.

दरम्यान, ‘नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल’ (एनजीटी) पॅनेलने ऑईल इंडिया कंपनी आवश्यक परवानग्या न घेता नैसर्गिक गॅस विहिरीचे संचालन करीत असल्याचा ठपका ठेवला असून एनजीटी त्यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले जाते .

leave a reply