युरोपच्या बाल्कन क्षेत्रात नव्या संघर्षाचा भडका उडणार

युरोपच्या बाल्कन क्षेत्रात नव्या संघर्षाचा भडका उडणार

Balkans-of-Europeबेलग्रेड/प्रिस्तिना/मॉस्को – युरोपातील बाल्कन क्षेत्र म्हणून ओळखण्यात येणाऱ्या भागातील सर्बिया व कोसोवोमधील तणाव चिघळण्याचे संकेत मिळत आहेत. कोसोवो सरकारच्या नव्या नियमांविरोधात सर्बवंशिय नागरिकांनी सुरू केलेल्या आंदोलनावर स्थानिक पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याचवेळी कोसोवोत तैनात असणाऱ्या नाटोच्या तुकड्यांनाही दक्षतेचा इशारा देण्यात आला. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर सर्बियासह रशियाने आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या वर्षभरात कोसोवो-सर्बियामध्ये तणाव चिघळण्याची ही दुसरी वेळ आहे.

गेल्या वर्षी कोसोवोतील सरकारने सर्बियातून येणाऱ्या तसेच सर्बियन नंबर प्लेट असणाऱ्या गाड्यांना कोसोवोच्या ‘टेंपररी नंबर प्लेट’ लावणे बंधनकारक असल्याचे जाहीर केले होते. त्यासाठी त्यांच्याकडून शुल्क आकारण्यात येईल, अशी घोषणाही केली होती. सर्बियन कागदपत्रे असणाऱ्यांना कोसोवोमध्ये प्रवेश नाकारण्याचेही संकेत देण्यात आले होते. यावर कोसोवो-सर्बिया सीमेवरील भागात राहणाऱ्या सर्बवंशिय नागरिकांकडून तीव्र नाराजी उमटली होती. कोसोवोतील सर्बवंशियांनी याविरोधात जोरदार आंदोलन सुरू केले. कोसोवो-सर्बिया सीमेवरील शहरांमध्ये येणारे प्रवेशमार्ग रोखून धरण्यात आले.

Balkans-Europeत्यानंतर नव्या तरतुदींची अंमलबजावणी एप्रिल 2022 पर्यंत स्थगित करण्यात आली होती. त्याचवेळी या कालावधीपर्यंत नवा तोडगा काढण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. मात्र पुढे काहीच हालचाली झाल्या नसून कोसोवो सरकारने 1 ऑगस्टपासून पुन्हा गेल्या वर्षी आणलेल्या नियमांची अंमलबजावणी सुरू करण्याचे जाहीर केले होते. त्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्याने एक महिन्यासाठी अंमलबजावणीला स्थगिती देण्यात आली.

मात्र यावेळी कोसोवो तसेच त्याच्या पाठीशी असणाऱ्या पाश्चिमात्य देश व नाटोने आक्रमक भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. नाटोने कोसोवोत तैनात केलेल्या तुकड्यांना दक्षतेचा इशारा दिला. कोसोवो-सर्बिया तणावात हस्तक्षेप करण्यासाठी नाटो तयार असल्याचे निवेदनही देण्यात आले.

दुसऱ्या बाजूला सर्बिया तसेच सर्बियाला समर्थन देणाऱ्या रशियानेही हालचाली सुरू केल्या आहेत. रशियाने संभाव्य संघर्षातर आपण सर्बियाला साथ देऊ अशी उघड घोषणा केली आहे. त्याचवेळी अमेरिका, युरोपिय महासंघ व कोसोवो सरकार चिथावणीखोर कारवाया करीत असून त्या थांबवाव्यात, असेही बजावले आहे.

सध्या युरोपात रशिया-युक्रेन संघर्ष सुरू आहे. या संघर्षाचा भडका अधिक तीव्र झाला असतानाच दुसरा संघर्ष पेट घेण्याचे संकेत मिळत आहेत. यामागे युरोपसह रशिया अस्थिर व कमकुवत करण्याचे कारस्थान असल्याचा दावा रशियन माध्यमांनी केला आहे.

leave a reply