देशात मंदीची अजिबात शक्यता नाही

-केंद्रीय अर्थमंत्र्यांचा दावा

नवी दिल्ली – देश मंदीच्या भोवऱ्यात अडकण्याची अजिबात शक्यता नाही, असा आत्मविश्वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत व्यक्त केला. जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांनीही भारतीय अर्थव्यवस्थेत मंदीची शक्यता नसल्याचा निर्वाळा दिलेला आहे, याकडेही केंद्रीय अर्थमंत्र्यांनी लक्ष वेधले. कोरोनाच्या साथीमुळे भारतीय अर्थव्यवस्था 8.2 वरून 7.2 टक्के इतक्या विकासदराने प्रगती करील, असे आंतरराष्ट्रीय वित्ततसंस्था सांगत असल्या, तरी भारत हाच जगात सर्वाधिक विकासदराने प्रगती करणारा देश आहे, ही बाब अर्थमंत्री सीतारामन यांनी लक्षात आणून दिली.

recession-in-the-countryभारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी पाहत असताना जगभरातील प्रमुख देशांच्या आर्थिक स्थितीकडे लक्ष वेधण्याची गरज असल्याचे सांगून अर्थमंत्री सीतारामन यांनी सलग दुसऱ्या तिमाहीत अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची पिछेहाट होत असल्याचे स्पष्ट केले. तर चीनमधल्या सुमारे चार हजार बँका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहेत. तर दुसऱ्या बाजूला भारतातील बुडीत कर्जांच्या वसुलीचे प्रमाण वाढले आहे. चीनच्या बँका दिवाळखोर बनत असताना, भारतातील बँकांनी दिलेली बुडीत कर्जे वसूल होत आहेत, ही लक्षणीय बाब ठरते, असे अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या.

दरम्यान, ब्ल्यूमबर्ग या वृत्तसंस्थेने केलेल्या निष्कर्षातही भारतीय अर्थव्यवस्था मंदीचा सामना करण्याची शक्यता शून्यावर असल्याचे अर्थतज्ज्ञांनी म्हटले होते. जगभरातील प्रमुख देशांना मंदीचा धोका संभवत असताना, भारत मात्र आश्वासक दराने आर्थिक प्रगती करीत आहे, हे या पाहणी अहवालातून उघड झाले होते.

leave a reply