युक्रेनमधील अमेरिकी ‘बायोलॅब्स’च्या मुद्यावर रशियाकडून पुराव्यांसह नवा प्रस्ताव

American 'biolabs' in Ukraineमॉस्को – अमेरिकेकडून युक्रेनमध्ये चालविण्यात येणाऱ्या जैविक प्रयोगशाळांच्या प्रकरणात रशियाने नव्या पुराव्यांसह प्रस्ताव सादर केला आहे. रशियाचे वरिष्ठ लष्करी अधिकारी इगॉर किरिलोव्ह यांनी याची माहिती दिली. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जीनिव्हात ‘बायोलॉजिकल वेपन्स कन्व्हेंशन’ची बैठक पार पडली. या बैठकीत रशियाने नवे पुरावे सादर करतानाच अमेरिका व युक्रेनने दिलेल्या माहितीवर सवाल उपस्थित केले आहेत. त्याचवेळी बैठकीनंतर काही दिवसांनी रशियाकडून ‘बायोलॉजिकल वेपन्स कन्व्हेंशन’शी संबंधित तरतुदींमध्ये काही दुरुस्त्याही सुचविण्यात आल्याचे किरिलोव्ह यांनी सांगितले.

American-biolabs-Ukraineयुक्रेनमध्ये लष्करी कारवाई सुरू केल्यानंतर काही दिवसांनी रशियाने युक्रेनमधील अमेरिकी बायोलॅब्सचा मुद्दा उपस्थित केला होता. अमेरिकेच्या संरक्षण विभागाकडून युक्रेनमध्ये 26 जैविक प्रयोगशाळा चालविण्यात येतात. यावर अमेरिकेचे थेट नियंत्रण असून कोरोनासह इतर अनेक घातक विषाणूंवर यात प्रयोग सुरू असल्याचे आरोप रशियाने केले आहेत. युक्रेनमधील जवान तसेच सामान्य नागरिकांवर विषाणूंचे प्रयोग करण्यात येत असल्याचे रशियाने म्हटले आहे. तसेच या प्रयोगशाळांशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचा मुलगा हंटर बायडेन यांचा संबंध असल्याचा दावाही रशियाने केला होता. युक्रेनच्या संसद सदस्यांनी अमेरिकी प्रयोगशाळांवर आक्षेप घेतल्याचेही रशियाने निदर्शनास आणून दिले होते. रशियाचे हे दावे चीनने उचलून धरले होते.

मात्र युक्रेन व अमेरिकेने रशियाचे आरोप फेटाळले आहेत. अमेरिकेच्या प्रयोगशाळा कार्यरत असल्या तरी त्यात घातक विषाणू अथवा साथींचे संशोधन होत असल्याचे युक्रेनने नाकारले होते. अमेरिकेने प्रयोगांची कबुली दिली असली तरी त्यासंदर्भात उघड केलेली माहिती पुरेशी नसल्याचे रशियाने म्हंटले आहे. त्याचवेळी रशियाने यासंदर्भातील पुरावे सादर केले असून त्यामुळे अमेरिका व युक्रेन अडचणीत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ‘बायोलॉजिकल वेपन्स कन्व्हेंशन’च्या बैठकीत अमेरिका व युक्रेन वगळता इतर देशांनी रशियाने दिलेले पुरावे मान्य केले असून त्यावर आक्षेप नोंदविले नसल्याचे रशियाकडून सांगण्यात आले.

leave a reply