तीन वर्षात ऑस्ट्रेलियाने युद्धासाठी तयार रहावे

लष्करी विश्लेषकांनी बजावले

सिडनी – चीनचा लष्करी विस्तार, तैवानविरोधातील आक्रमकता, साऊथ चायना सी क्षेत्रातील बेकायदेशीर कारवाया आणि दक्षिण पॅसिफिक क्षेत्रातील हालचाली, यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत, ऑस्ट्रेलियाने जुन्या लष्करी धोरणांपासून फारकत घेऊन तीन वर्षात युद्धासाठी तयार रहावे, असे ऑस्ट्रेलियातील लष्करी विश्लेषकांनी आपल्या सरकारला बजावले आहे.

australia china usकाही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचे माजी संरक्षणमंत्री स्टिफन स्मिथ आणि माजी हवाईदलप्रमुख सर अँगस ह्यूस्टन यांनी ‘स्ट्रॅटेजिक डिफेन्स रिव्ह्यू’ हा लष्करी अहवाल तयार केला. ऑस्ट्रेलियाचे विद्यमान पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांना पुढील वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत धोरणात्मक स्तरावर काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे या अहवालात बजावण्यात आले आहे. चीनचा धोका अधोरेखित करून ऑस्ट्रेलियाच्या आत्तापर्यंतच्या लष्करी धोरणात मोठे बदल करावे लागतील, असे या दोन्ही अधिकाऱ्यांनी यात सुचविले आहे.

याआधी कधीही नव्हता, तितका ऑस्ट्रेलिया सर्वाधिक असुरक्षित असल्याचा इशारा अँगस यांनी आपल्या अहवालातून दिला होता. ऑस्ट्रेलियातील लष्करी विश्लेषक देखील अँगस आणि स्मिथ यांनी मांडलेल्या अहवालाशी सहमत आहेत. येत्या काळातील धोका लक्षात घेऊन ऑस्ट्रेलियाने दहा वर्षांमध्ये नाही तर तीन ते पाच वर्षांमध्ये युद्धासाठी तयार रहावे, असे लष्करी विश्लेषक डॉ. ॲलन डूपाँट यांनी बजावले. त्याचबरोबर ड्रोन्स आणि सायबर युद्धाची देखील तयारी ठेवावी, असे डूपाँट यांनी सुचविले.

‘आत्तापर्यंत अमेरिका कुठल्याही युद्धाचे नेतृत्व करीत होती आणि ऑस्ट्रेलिया फक्त सहाय्य पुरवित होती. पण आत्ता ते दिवस गेले आहेत. आशिया-पॅसिफिक क्षेत्रात अमेरिकेला ऑस्ट्रेलियाची सर्वाधिक गरज असून आपण त्याचा फायदा घ्यायला हवा’, याकडे डूपाँट यांनी लक्ष वेधले. ऑस्ट्रेलिया अमेरिकेसाठी प्रशिक्षण, सरावाचे केंद्र ठरू शकते, असा दावा डूपाँट यांनी केला. तर ऑस्ट्रेलियाने फक्त अमेरिकेवर अवलंबून न राहता, जपान, दक्षिण कोरिया या देशांबरोबर लष्करी सहाय्य वाढवावे, असे विश्लेषक जॉन ब्लॅक्सलँड यांनी म्हटले आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियातील अल्बानीज यांचे सरकार चीनबरोबर सहकार्य सुधारण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. अशा परिस्थितीत, ऑस्ट्रेलियाचे माजी लष्करी अधिकारी आणि विश्लेषक चीनकडून वाढत असलेल्या धोक्याची आपल्या सरकारला जाणीव करून देत आहेत.

leave a reply