नौदलाच्या ताफ्यातील ब्रह्मोसची संख्या वाढणार

संरक्षण मंत्रालयाचा ब्रह्मोस एअरोस्पेसबरोबर करार

BrahMosनवी दिल्ली – भारतीय नौदलाची सज्जता अधिक वाढविण्यासाठी अतिरिक्त ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची खरेदी करण्यात येणार आहे. संरक्षण मंत्रालयाने ब्रह्मोस एअरोस्पेसबरोबर यासंबंधीच्या एका करारावर स्वाक्षऱ्या केल्या. दुहेरी क्षमता असलेल्या जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या खरेदीसाठी हा करार झाल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्यावतीने देण्यात आली. भारतीय संरक्षणदलांची सज्जता वाढविण्यासाठी शस्त्रास्त्रांची खरेदी वेगाने सुरू आहे. आवश्यकतेनुसार आणि संरक्षणदलांकडून नोंदविण्यात आलेल्या मागणीनुसार संरक्षण साहित्यांची खरेदी केली जात असून खरेदी प्रक्रियेत सुलभता आणून ती वेगवान करण्यात आली आहे. विशेषत: भारतीय बनावटीच्या, तसेच भारतात उत्पादन घेण्यात येत असलेल्या शस्त्रांच्या खरेदीवर भर दिला जात आहे. चार महिन्यांपूर्वीच संरक्षणमंत्रालयाने पुढील पाच ते सात वर्षात स्थानिक उद्योगांकडून 5 लाख कोटींचे संरक्षण साहित्य खरेदी केले जाणार असल्याचे म्हटले होते.

भारतीय नौदलालाही अधिक बळकट केले जात असून गेल्या काही महिन्यांमध्ये पहिली स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतसह काही स्टेल्थ विनाशिका, पाणबुडीविरोधी युद्धतंत्रामध्ये अतिशय महत्त्वाच्या ठरतील अशा युद्धनौकांचा समावेश नौदलाच्या ताफ्यात झाला आहे. या युद्धनौका स्वदेशी बनावटीच्या आहेत. या युद्धनौकांना ब्रह्मोसच्या अद्ययावत आवृत्तीने सज्ज केले जाणार असल्याचे वृत्त आहे.

ब्रह्मोस क्षेत्रणास्त्रांचा वापर भारतातील तीनही संरक्षणदल आधीपासून करीत आहे. हे क्षेपणास्त्र सतत अद्ययावत केले जात असून त्यांची मारक क्षमता गेल्या काही वर्षात वाढवून 290 किमीवरून 400 किमीपर्यंत करण्यात आली आहे. तर या क्षेपणास्त्रांची मारक क्षमता 800 किमीपर्यंत वाढविण्यावर काम सुरू आहे. तसेच ब्रह्मोसच्या जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या दुहेरी वापराची क्षमता असलेले क्षेपणास्त्र खास नौदलासाठी खरेदी केले जात आहे. ही क्षेपणास्त्रे जमिनीवरील लक्ष्याचा भेद घेऊ शकतात. त्याचबरोबर युद्धनौकेलाही लक्ष्य करु शकतात. तसेच जहाजविरोधी हल्ल्यांनाही रोखू शकतात. यामुळे नौदलाची क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढेल, असा दावा केला जात आहे.

ब्रह्मोस एअरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेडबरोबर यासाठी 1700 कोटी रुपयांचा करार झाला आहे. काही वृत्तांमध्ये एकूण 35 क्षेपणास्त्रांची खरेदी या करारानुसार करण्यात येत असून ही क्षेपणास्त्रे पी-15बी श्रेणीतील स्टेल्थ विनाशिकांवर तैनात केली जाणार आहे. ही श्रेणी विशाखापट्टणम श्रेणी म्हणूनही ओळखली जाते. या श्रेणीतील आयएनएस विशाखापट्टणम ही विनाशिका गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये भारतीय नौदलात दाखल झाली होती. तर या श्रेणीतील आणखी तीन विनाशिकांचे जलावतरण झाले असून त्याच्या चाचण्या सुरू आहेत.

leave a reply