इराणमधील राजवट उलथली तरच अणुकार्यक्रमावर तोडगा निघेल

-अमेरिका व इराणच्या नेत्यांचा दावा

वॉशिंग्टन – अमेरिका आणि इराण अणुकराराच्या अंतिम टप्प्यात पोहोचले असून लवकरच उभय देशांमध्ये अणुकरार पार पडेल, असा दावा दोन्ही देशांची माध्यमे करीत आहेत. हा अणुकरार शक्य झाला तर इराण अण्वस्त्रनिर्मितीच्या जवळ पोहोचेल, अशी चिंता इस्रायल व्यक्त करीत आहे. पण अमेरिका व इराणच्या काही नेत्यांनी इराणमधील आयातुल्ला खामेनी व राष्ट्राध्यक्ष रईसी यांची राजवट उलथण्याची घोषणा केली. असे झाले तरच अणुकार्यक्रमावर तोडगा निघेल, असा दावा या नेत्यांनी केला.

NCRI-US१९७९ साली इराणमध्ये झालेल्या इस्लामी क्रांतीनंतर कट्टरपंथियांनी इराणच्या राजवटीचा ताबा घेतला. याचा कडाडून विरोध करून इराणमध्ये लोकशाहीवादी सरकार स्थापन करण्याची मागणी इराणमधील सुधारणावादी गटांनी केली होती. पण इराणचे सर्वोच्च धार्मिक नेत्यांच्या आदेशानंतर लोकशाहीची मागणी करणाऱ्या नेत्यांवर कारवाई झाली. हजारो जण इराणमधून पळ काढण्यात यशस्वी ठरले. पुढे फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये ‘नॅशनल काऊन्सिल ऑफ रेझिस्टन्स ऑफ इरान-एनसीआरआय’ या गटाची उभारणी झाली.

गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ इराणमध्ये खामेनी यांची राजवट राज्य करीत असल्याचा आरोप याच गटाने केला होता. इराणच्या नातांझ येथील छुप्या अणुकार्यक्रमाला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘एनसीआरआय’ने अमेरिकेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी एनसीआरआयचे बंडखोर नेते अलीरेझा जाफराझादेह यांच्यासह अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन, जो लिबरमन, तसेच अमेरिकेच्या युरोपिय कमांडचे माजी उपप्रमुख जनरल चक वाल्ड तसेच रॉबर्ट जोसेफ आणि ओली हैनोनेन उपस्थित होते.

या बैठकीमध्ये इराणचा अणुकार्यक्रम येथील राजवटीशी जोडलेला असल्याचे इराण व अमेरिकेच्या नेत्यांनी सांगितले. हा अणुकार्यक्रम रोखायचा असेल तर इराणमधील जनतेचे सहाय्य घेऊन राजवट उलथावी लागेल, असा इशारा अमेरिका व इराणच्या नेत्यांनी दिला.

leave a reply