रशिया-इराण-अझरबैजानमध्ये ‘ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर’संदर्भात सामंजस्य करार

'ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर’तेहरान – रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावरील समीकरणे वेगाने बदलत असल्याचे संकेत मिळत आहेत. रशियाने विरोधात उभ्या ठाकलेल्या पाश्चिमात्य देशांच्या आघाडीला विविध पातळ्यांवर शह देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी आखात व आशियाई देशांबरोबरील सहकार्य वाढविण्यात येत असून ‘इंटरनॅशनल नॉर्थ-साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर’सारख्या महत्त्वाकांक्षी योजनांना वेग देण्यात आला आहे. यासंदर्भात सोमवारी रशिया, इराण व अझरबैजानमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

'ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर’दोन दशकांपूर्वी रशियासह भारत व इराण या देशांनी ‘इंटरनॅशनल नॉर्थ-साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर’ची(आयएनएसटीसी) योजना आखली होती. मात्र भू-राजकीय तणाव व इतर कारणांमुळे योजना पुढे जाऊ शकली नव्हती. पण गेल्या काही वर्षात योजना पुढे सरकू लागली असून रशिया, भारत व इराण या तिन्ही देशांनी त्याला वेग देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. इराणची राजधानी तेहरानमध्ये पार पडलेला करार त्याचाच भाग ठरतो.

'ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर’वाहतुकीचे विविध मार्ग व सुविधा यांच्या सहाय्याने व्यापाराची गती व व्याप्ती वाढविणे हा ‘आयएनएसटीसी’चा उद्देश आहे. यात महामार्ग, रेल्वे तसेच सागरी मार्गांचा समावेश आहे. सध्या रशिया व इराणमध्ये रस्त्याच्या मार्गाने होणारा व्यापार अझरबैजानच्या माध्यमातून होतो. या व्यापाराची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी, यासाठी सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाश्चिमात्य देशांनी रशियावर मोठ्या प्रमाणात निर्बंध लादले आहेत. ‘आयएनएसटीसी’सह विविध पर्यायांचा वापर करून रशियाने या निर्बंधांना शह दिला आहे. इराणलाही याचे मोठे लाभ मिळत असून आपले महत्त्व वाढविण्यासाठी इराण ‘आयएनएसटीसी’चा वापर करीत असल्याचा दावा विश्लेषकांनी केला होता.

leave a reply