सरकारी इंधन कंपन्यांचे ५० टक्के पेट्रोल पंप सौरउर्जेवर चालणार

- केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान

नवी दिल्ली – देशातील ५० टक्के पेट्रोल आणि गॅस पंप पुढील ५ वर्षात सौर उर्जेवर चालतील, यादृष्टीने काम सुरु झाल्याचे पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जाहीर केले. इंटरनॅशनल सोलर अलायन्सच्या (आयएसए) शिखर परिषदेत प्रधान बोलत होते.

५० टक्के पेट्रोल

“कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी सौर, पवन, जैवइंधन आणि हायड्रोजन सारख्या हरित ऊर्जा गुंतवणूकीवर अधिक भर देण्यात येत आहे. याअंतर्गत देशातील इंधन कंपन्या आपले पंप सौरउर्जेवर चालविणार आहेत. पुढील पाच वर्षात ५० टक्के पट्रोल पंप सौर उर्जेवर चालविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि भारत पेट्रोलियम या सरकारी इंधन कंपन्यांचे देशभरात सुमारे ६३,१५० पेट्रोल पंप कार्यरत आहेत. या ठिकाणी सौर पॅनेल बसवण्यात सुरुवात झाली आहे. या इंधन कंपन्यांची सध्याची सौर उर्जा क्षमता २७० मेगावॅट असून येत्या वर्षात अतिरिक्त ६० मेगावॅट सौर क्षमता जोडली जाईल. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी इंधन कंपनी इंडियन ऑईलच्या ५ हजाराहून अधिक पंपांवर सौर ऊर्जा पॅनल बसवण्यात आले आहेत.

ऑइल अँड नॅचरल गॅस कोर्पोरेशन लिमिटेड (ओएनजीसी), इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल), हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) आणि गेल (इंडिया) लिमिटेड इंटरनॅशनल सोलर अलायन्समध्ये (आयएसए) कॉर्पोरेट भागीदार म्हणून सहभागी होणार आहे, असे पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जाहीर केले. तसेच या कंपन्या ‘आयएसए’च्या कॉर्पस फंडात प्रत्येकी १० लाख डॉलर्सचे योगदान देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

leave a reply