‘अनलॉक ४’ अंतर्गत नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार

नवी दिल्ली – ‘अनलॉक ४’ अंतर्गत मार्च पासून बंद असलेल्या शाळा आणि महाविद्यालये अखेर सुरु होणार आहेत. केंद्र सरकारने या जाहीर केल्याप्रमाणे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून यासंदर्भांत परवानगी देण्यात आली. तसेच ‘स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर’ (एसओपी) जारी करण्यात आली आहे. नववी ते १२ वी चे वर्ग या आदेशांतर्गत सुरु केले जाऊ शकतील. मात्र वर्ग सुरू करण्यासंदर्भत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य शाळा व महाविद्यालय प्रशासनाकडे देण्यात आले आहे. दिल्ली, बिहार आणि आंध्रप्रदेश सरकारने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

'अनलॉक ४'

अनलॉकची-४ अंतर्गत २१ सप्टेंबरपासून शाळा अंशतः सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा व महाविद्यालयांसाठी नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे. यानुसार केवळ नववी ते बारावी पर्यंत वर्ग उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय ऑनलाइन आणि डिस्टन्स लर्निंगही सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

शाळेत दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फुटांचे अंतर राहिल अशी व्यवस्था शालेय प्रशासनाला करण्याची सूचना देण्यात आली आहे. तसेच वेळोवेळी हात धुणे, फेस कव्हर लावणे, शिंक आल्यास तोंडावर हात ठेवणे, स्वतःच्या प्रकृतीकडे स्वतःच योग्य लक्ष देणे आणि थुंकण्यासारख्या गोष्टींवर काटेकोरपणे लक्ष ठेवणे यासारख्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांसह संपूर्ण कर्मचार्‍यांचे थर्मल स्कॅनिंग शाळा आणि महाविद्यालयाच्या आवारात प्रवेश करण्यापूर्वी करणे बंधनकारक असेल. थर्मल स्कॅनिंगमध्ये एखादा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा संशय आला असेल, तर त्याला वेगळे केले जाईल आणि आरोग्य विभाग, पालकांना त्याबद्दल कळविले जाईल. कोरोनाचे लक्षण असणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार नाही.

शाळांना जास्तीतजास्त ५० टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बोलावण्याची परवानगी देण्यात आली आहे. ९वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पालकांची लेखी परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त त्यांच्याकडे ऑनलाइन शिक्षणाचा पर्यायही उपलब्ध असेल.

संक्रमणाचा धोका वाढू शकतो म्हणून विद्यार्थ्यांच्या एकत्र येण्याला परवानगी दिलेली नाही. याव्यतिरिक्त शाळांमध्ये राज्यातील हेल्पलाईन क्रमांक आणि स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांचे नंबरही बोर्डवर लिहीणे बंधनकारक करण्यात आले आहे. कंन्टेन्मेंट झोनच्या जवळ राहणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांना शाळेत जाण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. तसेच ज्या शाळांचा क्वारंटाइन सेंटर म्हणून वापर करण्यात आला होता, त्या सुरू करण्यापूर्वी योग्यरित्या सॅनिटाईझ करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

leave a reply