‘आगरतळा-अखुरा’ रेल्वे प्रकल्पाला वेग

- रेल्वेमंत्री पियुष गोयल

गुवाहाटी – आगरतळा ते बांगलादेशमधील अखुरा दरम्यान १२ किलोमीटरचा रेल्वेमार्ग उभारण्याचे कामाला वेग देण्यात आला असून लवकरच हा मार्ग पूर्ण होईल. या मार्गामुळे त्रिपुरा आणि कोलकातामधील अंतर तब्ब्ल ११०० किलोमीटरने कमी होणार आहे, असे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे. तसेच ईशान्येकडील आठ राज्ये रेल्वेने एकमेकांशी जोडण्याचे काम सुरु असल्याचेही केंद्रीय रेल्वेमंत्री गोयल म्हणाले.

दक्षिण त्रिपुरामध्ये विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) च्या पायाभरणी समारंभात बोलताना केंद्रीय रेल्वेमंत्री गोयल यांनी भारत बांगलादेशमध्ये उभारण्यात येत असलेल्या या रेल्वेमार्गाची माहिती दिली. याचबरोबर ईशान्येकडील राज्ये रेल्वेने एकमेकांना जोडण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ईशान्य फ्रंटियर रेल्वेने (एनएफआर) यापूर्वीच आसामचे मुख्य शहर गुवाहाटी, त्रिपुराची राजधानी आगरतळा आणि अरुणाचल प्रदेशचे इटानगर रेल्वेने जोडले असल्याचे गोयल यांनी लक्षात आणून दिले.

ईशान्येकडील राज्यांचा विकास झाल्यास आग्नेय आशियाई देशांबरोबरील व्यापार,पर्यटन वाढीस मोठ्या प्रमाणात मदत मिळणार आहेच. याचबरोबर ‘अ‍ॅक्ट ईस्ट’ धोरणाला दखल अधिक बळकटी मिळेल. त्यामुळे येथील पायाभूत सुविधांच्या विकासाकडे प्राधान्याने लक्ष पुरविण्यात येत असल्याचे रेल्वेमंत्री गोयल म्हणाले.

त्रिपुरा ते कोलकाता हे रेल्वेमार्गाने अंतर १५२९ किलोमीटर इतके आहे. मात्र त्रिपुरा आणि बांग्लादेशमध्ये उभारण्यात येणाऱ्या आगरतळा-अखुरा रेल्वे मार्गामुळे ११०० किलोमीटरचे अंतर कमी होणार आहे, अशी माहिती गोयल यांनी दिली. या रेल्वे मार्गाच्या कामाला वेग देण्यात आला असून लवकरच हा मार्ग बांधून तयार होईल, असे रेल्वेमंत्री गोयल यांनी सांगितले.

भारत आणि बांगलादेशमधील सहकार्यात सातत्याने वाढ होत असून रस्ते, जल आणि रेल्वेमार्गाने दोन्ही देशांना जोडण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. भारत आणि बांगलादेशमध्ये बंद पडलेले सात रेल्वेमार्ग सुरु करण्यात येत आहेत. यातील चार मार्ग सुरु झाले असून तीन मार्गाचे काम सुरु आहे. आगरतळा ते अखुरा उभारण्यात येणाऱ्या या मार्गामुळे प्रामुख्याने त्रिपुरा आणि कोलकातामधील प्रवास सुखकर होणार असून मोठ्या प्रमाणात वेळेची बचत होणार आहे.

दोन महिन्यापूर्वीच बांगलादेशच्या चितगोंग बंदरमार्गे कोलकातावरून सागरी मार्गाने आगरतळाला कंटेनर जहाज पाठवण्यात आले होते. या मार्गामुळे ईशान्य भारतात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठ्याचा नवा मार्ग खुला झाला. त्यानंतर नदी मार्गानेही बांगलादेश आणि त्रिपुरादरम्यान मालवाहतूक सुरु झाली होती.

leave a reply