अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर भारतविरोधी कारवायांसाठी होता कामा नये

-भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांचा इशारा

दोहा – शनिवारपासून कतारमध्ये अफगाणिस्तानातील गनी सरकार आणि तालिबानमध्ये ऐतिहासिक शांतीचर्चा सुरू झाली. या शांतीचर्चेने अफगाण सरकार आणि तालिबानमध्ये दोन दशके सुरू असलेल्या संघर्षाला पूर्णविराम मिळेल, असा विश्वास अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी व्यक्त केला. तर या शांतीचर्चेला व्हर्च्युअल उपस्थित असलेल्या भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर भारतविरोधी कारवायांसाठी होता कामा नये, असा खणखणीत इशारा दिला. त्याचबरोबर या शांतीचर्चेवर पूर्णपणे अफगाणिस्तानचे नियंत्रण असावे, असे सांगून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सदर चर्चेवर पाकिस्तान टाकत असलेल्या प्रभावाच्या विरोधात भारताची भूमिका मांडली.

शनिवारी कतारची राजधानी दोहा येथील चर्चा सुरू होण्याच्या काही तास आधी तालिबानने अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतात अफगाणी सुरक्षा दलांवर चढविलेल्या हल्ल्यात १६ जवानांचा बळी गेला. त्यामुळे पुन्हा ही चर्चा पुढे ढकलली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. पण अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांच्या अध्यक्षतेखाली ही चर्चा सुरु झाली. या चर्चेला भारतासह ३० देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तालिबानच्या शांतीचर्चेत भारताची उपस्थिती अत्यंत महत्त्वाची ठरते.

अफगाणिस्तानच्या विकासात मोठे योगदान देणार्‍या भारताने शेजारी देश म्हणून अफगाणिस्तानातील शांतीचर्चेत महत्त्वाची भूमिका बजावावी, अशी मागणी अमेरिकेकडून केली जात होती. या पार्श्वभूमीवर, भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी या बैठकीला व्हर्च्युअल उपस्थिती लावून भारताची भूमिका स्पष्ट केली. भारत आणि अफगाणिस्तानची मैत्री यापुढेही कायम राहील, असा विश्वास परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी व्यक्त केला. तर अफगाणिस्तानातील कुठलीही शांतीचर्चा ही अफगाण पुरस्कृत, अफगाण नियंत्रित असावी. तसेच अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्त्वाचा आणि एकात्मतेचा आदर करणारी व लोकशाहीवर आधारीत असावी, असा संदेश परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी दिला.

अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर भारतविरोधी कारवायांसाठी होता कामा नये, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी बजावले. अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यास, भारताचा अफगाणिस्तानवरील प्रभाव कमी होईल, असे पाकिस्तानला वाटत आहे. याआधीच अफगाणिस्तानातील तालिबानी दहशतवाद्यांना भारताविरोधात वापरण्यासाठी पाकिस्तानी लष्कर आणि कुख्यात गुप्तचर यंत्रणा आयएसआय’चे प्रयत्न सुरू असल्याचे उघड झाले आहे. त्याचबरोबर भारतविरोधी लश्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद या संघटनांनी हक्कानी नेटवर्कच्या सहाय्याने अफगाणिस्तान-पाकिस्तानच्या सीमाभागात प्रशिक्षण घेत असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे हे विधान अत्यंत महत्त्वाचे ठरते.

कतारमधील या चर्चेला, अफगाणिस्तान सरकारकडून मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दुलाह अब्दुलाह तर तालिबानचा उपप्रमुख मुल्लाह अब्दुल घनी बरादर उपस्थित होते. या शांतीचर्चेदरम्यान अब्दुलाह अब्दुलाह यांनी अफगाणिस्तानला शांतता हवी आहे, असे म्हटले. दोन्ही गटांनी प्रामाणिकपणे एकमेकांच्या साथीने काम केले, तर अफगाणिस्तानातील समस्या सुटतील. आपल्या सरकारला अफगाणिस्तानात संघर्षबंदी हवी असल्याचे अब्दुल्लाह म्हणाले. तर तालिबानचा उपप्रमुख बरादर याने अफगाणिस्तानात इस्लामी राजवट स्थापन करायची आहे, असे सांगून तालिबानचे इरादे स्पष्ट केले.

leave a reply