‘आयटीबीपी’ला ड्रोन्स, रडार्स, सोनार यंत्रणा पुरविणार

नवी दिल्ली – चीनला लागून असलेल्या सीमांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या ‘इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांना’ (आयटीबीपी) लवकरच अत्याधुनिक संरक्षण साहित्याने सज्ज करण्यात येणार आहे. ‘आयटीबीपी’साठी मानवरहित विमाने, रडार्स, उच्चप्रतीचे टेहळणी कॅमेरे, स्नो स्कूटरची खरेदी करण्यात येणार असून यासंबंधीच्या प्रस्तावाला सरकार लवकरच मंजुरी देऊ शकते, अशी बातमी आहे.

लडाखमधील पॅगोंग त्सो, गलवान व्हॅली, गोगरा पोस्ट, डेस्पान्गमध्ये भारत आणि चीनमधील तणाव कमालीचा वाढला आहे. अशावेळी या सीमेवर तैनात ‘आयटीबीपी‘च्या जवानांसाठी अत्याधुनिक उपकरणे, गॅजेट्सची खरेदी करण्यात येणारे आहे. लडाख, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड सिक्किम, आणि हिमाचल प्रदेशमधील एकूण ३४८८ किलोमीटर लांब भारत-चीन सीमेच्या संरक्षणाची जबाबदारी ‘आयटीबीपी’वर आहे. सध्या ‘आयटीबीपी’च्या चीन सीमेवर १८० सीमा चौक्या असून या सीमा चौक्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे.

जानेवारी महिन्यात 47 अतिरिक्त चौक्या आणि बारा छावण्यांना गृह मंत्रालयाने मंजुरी दिली होती. चीन बरोबरील वाढलेला तणाव पाहता या चौक्या आणि छावण्यांच्या उभारणीला गती देण्यात आली आहे. याशिवाय ‘आयटीबीपी’च्या जवानांना अत्याधुनिक संरक्षण कहाणी साहित्याने सज्ज करण्यात येत आहे. चीनच्या सीमेमध्ये सुमारे पंचवीस ते तीस किलोमीटर आत पर्यंत टेहळणी करता येईल, असे उच्च प्रतीचे कॅमेरे ‘आयटीबीपी’ च्या जवानांना पुरवण्यात येणार आहेत. याशिवाय येथील पर्वतीय क्षेत्रांमध्ये चीनच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी ‘ड्रोन्स‘चाही पुरवठा करण्यात येणार आहे.

याखेरीज ‘लार्ज रेंज रिकंनाइसन्स अँड ऑब्झर्वेशन सिस्टम’ (एलओआरआरओ) या सोनार सिस्टीमचाही पुरवठा ‘आयटीबीपी’ला केला जाणार आहे. या सोनार सिस्टीममुळे दिवसा आणि रात्री मानवी आणि वाहनांची कोणतीही हालचाल टिपता येईल. खराब वातावरणात ही सोनार सिस्टिम काम करू शकेल. रडार्स, कुठल्याही भूप्रदेशात उपयोगी पडतील अशी विशेष वाहने, नव्याने मंजूर करण्यात आलेल्या सीमा चौक्यांसाठी स्नो स्कूटर्स पुरवण्याचा प्रस्ताव ही सरकार समोर आहे. या प्रस्तावांना सरकारकडून लवकरच मंजुरी मिळू शकते, असा दावा वृत्त अहवालात करण्यात आला आहे.

leave a reply