…तर उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांच्याविरोधातही कारवाई होईल

- रिपब्लिकन सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांचा इशारा

कमला हॅरिसवॉशिंग्टन – ‘‘‘आम्ही, ज्यातून काय बाहेर येईल याची कल्पनाही करता येणार नाही असा ‘पँडोराज् बॉक्स’, अमेरिकेतील भावी राष्ट्राध्यक्षांसाठी उघडला आहे’’, असा खळबळजनक इशारा रिपब्लिकन पक्षाचे वरिष्ठ सिनेटर व नेते लिंडसे ग्रॅहम यांनी दिला. भविष्यात रिपब्लिकन पक्षाने अमेरिकेच्या संसदेवर नियंत्रण मिळविले तर उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांच्याविरोधात महाभियोग चालविला जाऊ शकेल, असेही ग्रॅहम यांनी बजावले आहे. ग्रॅहम यांच्या या वक्तव्याने पुढील काळात अमेरिकेतील राजकीय व अंतर्गत संघर्ष अधिकच तीव्र होईल, असे संकेत मिळत आहेत.

माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात दुसर्‍यांदा महाभियोगाची कारवाई करून त्यांना दोषी ठरविण्याचे डेमोक्रॅट पक्षाचे प्रयत्न उधळले गेले आहेत. आपल्याविरोधात दुसर्‍यांदा महाभियोग दाखल करण्याच्या हालचाली या डेमोक्रॅट पक्षाकडून राजकीय सूडबुद्धिने राबविण्यात येणार्‍या मोहिमेचा भाग असल्याचा आरोप ट्रम्प यांनी शनिवारी केला. ट्रम्प यांच्या मुक्ततेनंतर अमेरिकेतील राजकीय वर्तुळातून आक्रमक प्रतिक्रिया उमटत असून ग्रॅहम यांनी दिलेला इशारा त्याचाच भाग ठरतो.

कमला हॅरिस‘फॉक्स न्यूज’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी डेमोक्रॅट पक्षाकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांवर जोरदार टीका केली. ‘डेमोक्रॅट पक्षाने आणलेला महाभियोगाचा प्रस्ताव घटनाबाह्य व कायद्याचा अपमान करणार होता. आम्ही अमेरिकेतील भावी राष्ट्राध्यक्षांसाठी पँडोराज् बॉक्स उघडला आहे. जर पुढे याच मॉडेलचा वापर करायचा झाला, तर रिपब्लिकन पक्षाने संसदेच्या प्रतिनिधीगृहावर नियंत्रण मिळविल्यावर उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांच्याविरोधातही महाभियोगाची कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही’, असे ग्रॅहम यांनी बजावले.

अमेरिकेच्या संसदेत झालेल्या महाभियोग कारवाईच्या सुनावणीदरम्यान ट्रम्प यांच्या वकिलांनी कमला हॅरिस यांनी मांडलेल्या काही प्रस्तावांचा उल्लेख केला होता. त्यात ‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’ आंदोलनातील निदर्शकांना सोडविण्यासाठी स्वतंत्र निधीचा पुरस्कार करणे या प्रस्तावाचा समावेश आहे. रिपब्लिकन पक्ष भविष्यात याचा वापर करण्याचे संकेत ग्रॅहम यांच्या वक्तव्यातून मिळत आहेत. आपल्या मुलाखतीत ग्रॅहम यांनी, २०२२ सालच्या संसदीय निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाकडून प्रचार करण्यास डोनाल्ड ट्रम्प उत्सुक असल्याचेही संकेत दिले आहेत.

दरम्यान, डेमोक्रॅट पक्षाकडून ट्रम्प समर्थक व रिपब्लिकन पक्षातील आक्रमक विचारसरणीला प्रोत्साहन देणार्‍यांना कोंडीत पकडण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. कॅलिफोर्नियातील संसद सदस्य सारा जेकब्स यांनी गौरवर्णियांचा प्रभाव व उजव्या विचारसरणीच्या माध्यमांची चौकशी करण्यासाठी आयोग स्थापन करण्याचा प्रक्षोभक प्रस्ताव मांडला आहे.

‘सीएनएन’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा प्रस्ताव मांडला आहे. वांशिक पातळीवर होणारा अन्याय, गौरवर्णियांचा प्रभाव यासारख्या गोष्टींची योग्य दखल घेतली नसल्याचा दावाही त्यांनी केला. त्याचवेळी ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोगाची कारवाई ही फक्त एक सुरुवात असल्याचा इशाराही जेकब्स यांनी यावेळी दिला.

leave a reply