अफगाणिस्तानच्या ५१ टक्के भूभागावर तालिबानचा ताबा

- अफगाणी वृत्तसंस्थेचे सर्वेक्षण

५१ टक्के भूभागकाबुल – तालिबानच्या दहशतवाद्यांनी कुंदूझ प्रांतातील महत्त्वाच्या शहरांचा ताबा घेतला असून यामध्ये लष्करी तळांचा देखील समावेश आहे. याबरोबर अफगाणिस्तानातील ५१ टक्के भूभाग तालिबानच्या नियंत्रणाखाली गेला आहे. गेल्या चार महिन्यांमध्ये तालिबानच्या कारवायांची तीव्रता वाढल्याचे अफगाणिस्तानच्या वृत्तसंस्थेने आपल्या सर्वेक्षणात म्हटले आहे. दरम्यान, अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीच्या मुद्यावर अमेरिकेचे बायडेन प्रशासन कोंडीत सापडले आहे.

वर्षभरापूर्वी, तालिबानबरोबर शांतीकरार करताना अमेरिकेने २०२१ सालच्या मे महिन्याच्या आधी अफगाणिस्तानाती आपले सारे सैन्य माघारी घेण्याचे मान्य केले होते. याच्या मोबदल्यात तालिबानने अफगाणिस्तानातील हिंसाचार रोखण्याची तयारी दाखविली होती. तसेच अल कायदाबरोबरील संबंध ठेवणार नाही, अशी हमी देखील तालिबानने दिली होती. मात्र, गेल्या काही आठवड्यांपासून अफगाणिस्तानात तालिबानच्या भीषण हल्ल्यांचे सत्र सुरू झाले आहे.

५१ टक्के भूभागया हल्ल्यांमध्ये शेकडो अफगाणी जनता व सरकारी अधिकारी आणि लष्करी जवानांचा बळी गेला आहे. त्याचबरोबर तालिबानने अफगाणिस्तानातील सरकारच्या तुलनेत अधिक भूभागावर नियंत्रण मिळविला आहे. अफगाणी वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या सर्वेक्षणानुसार, अफगाणिस्तानच्या ५१ टक्के भूभागावर तालिबानचे ५१ टक्के भूभागनियंत्रण आहे. तर ४९ टक्के भूभागावर अफगाणिस्तान सरकारचे प्रशासन आहे. नोव्हेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या चार महिन्याच्या कालावधीत तालिबानच्या नियंत्रणाखाली मोठा भूप्रदेश गेल्याचा दावा सदर वृत्तसंस्थेने केला आहे.

किमान सव्वा तीन लाख चौरस किलोमीटरहून अधिक भूभागावर तालिबानने ताबा घेतला आहे. तर तीन लाख चौरस किलोमीटरहून कमी भूभाग अफगाणिस्तानातील गनी सरकारच्या नियंत्रणाखाली आहे. पण तालिबानच्या प्रवक्त्याने अफगाणिस्तानच्या ७० टक्के भूभागावर आपला ताबा असल्याचा दावा केला आहे. तर अफगाणिस्तानच्या भूभागावर तालिबानचा ताबा असला तरी सदर भूभागाचे नियंत्रण पाकिस्तानातून केले जात असल्याचा ठपका अफगाणिस्तानने ठेवला आहे. आजही पाकिस्तानात बसून तालिबानचे नेते अफगाणिस्तानवर कब्जा करण्याची योजना आखतात. येथील जनतेवर हल्ले चढविण्याचे कट रचतात, असा आरोप अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हमदुल्ला मोहिब यांनी केला.

leave a reply