‘डीआर काँगो’तील दहशतवादी हल्ल्यांमध्ये २१ जणांचा बळी

- दोन आठवड्यातील तिसरा हल्ला

२१ जणांचा बळीकिन्शासा – आफ्रिकेतील ‘डीआर काँगो’मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये किमान २१ जणांचा बळी गेला आहे. ‘डीआर काँगो’च्या ईशान्य तसेच दक्षिण भागात हे हल्ले करण्यात आले. रविवारी सकाळी ‘डीआर काँगो’तील दुसर्‍या क्रमांकाचे शहर असणार्‍या ‘लुबंबाशी’जवळील लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले. त्याचवेळी ईशान्येकडील इतुरी प्रांतात एन्दायामध्ये ख्रिस्तधर्मियांच्या प्रार्थनास्थळावर हल्ला करून ते पेटवून दिल्याची बातमी आली आहे.

हल्ल्यामागे ‘आयएस’ व ‘अल कायदा’ या दोन्ही दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा संशय असणार्‍या ‘एडीएफ’ या गटाचा हात असल्याचे मानले जाते. गेल्या दोन आठवड्यात ‘एडीएफ’ने दहशतवादी हल्ले करण्याची ही तिसरी वेळ आहे. रविवारी सकाळी ‘लुबंबाशी’जवळील किंबेबे व कबिती या दोन लष्करी तळांवर हल्ले झाले. त्यात चार जवानांसह एका नागरिकाचा बळी गेला आहे. यावेळी झालेल्या चकमकींमध्ये सहा दहशतवादी ठार झाल्याचीही माहिती देण्यात आली आहे.

२१ जणांचा बळीईशान्य भागातील इतुरी प्रांतात दहशतवादी गटाने एन्दाया गावाला लक्ष्य केले. हल्ल्यात १३ नागरिकांसह तीन जवानांचा बळी गेला आहे. दहशतवादी गटाने गावातील ख्रिस्तधर्मियांचे प्रार्थनास्थळ पेटविल्याची माहिती सूत्रांनी दिली. हल्ल्यानंतर लष्कराने राबविलेल्या मोहिमेत चार दहशतवादी ठार झाल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. गेल्या दोन आठवड्यात ‘एडीएफ’च्या दहशतवाद्यांनी तिसर्‍यांदा हल्ले चढविले आहेत. यापूर्वी केलेल्या दोन हल्ल्यांमध्ये २०हून अधिक जणांचा बळी गेला होता.

‘एडीएफ’ ही युगांडा व ‘डीआर काँगो’मध्ये सक्रिय असणार्‍या प्रमुख दहशतवादी संघटनांपैकी एक म्हणून ओळखली जाते. दोन्ही देशांच्या लष्करांनी राबविलेल्या मोहिमेत या दहशतवादी संघटनेची ताकद कमी झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र नव्या वर्षात हल्ले पुन्हा वाढू लागले असून ही दहशतवादी संघटना प्रबळ होत असल्याचे मानले जाते. एकापाठोपाठ होणार्‍या दहशतवादी हल्ल्यांमुळे लष्कर तसेच सुरक्षायंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरल्याचे आरोप करण्यात येत आहेत.

leave a reply