अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांचा तालिबानसह पाकिस्तानला इशारा

काबूल – ११ सप्टेबर रोजी अफगाणिस्तानातील अमेरिकन सैन्य माघारी घेतले जाईल, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी केली होती. मात्र तालिबानशी केलेल्या करारानुसार अमेरिकेने आपले सैन्य १ मेपर्यंत माघारी घेणे अपेक्षित होते. त्यामुळे अमेरिकेचा निर्णय कराराचा भंग करणारा आहे आणि त्यासाठी अमेरिकेला जबाबदार धरले जाईल, असे तालिबानने बजावले आहे. तालिबानकडून अशा धमक्या येत असताना, अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी, अमेरिकेच्या सैन्यमाघारीनंतर अफगाणिस्तानचे सरकार कोसळणार नाही, अशी ग्वाही दिली आहे. त्याचवेळी अफगाणिस्तानचे सरकार आणि आंतरराष्ट्रीय समुदायाशी सहकार्य करायचे की तालिबान आणि कट्टरवादी संघटनांच्या बाजूने उभे रहायचे, याचा निर्णय पाकिस्तानला घ्यायचा आहे, असे सांगून राष्ट्राध्यक्ष गनी यांनी आपल्या शेजारी देशालाही खडे बोल सुनावले आहेत.

अमेरिका व नाटोचे सैन्य ११ सप्टेंबर रोजी अफगाणिस्तानातून संपूर्ण सैन्यमाघार घेणार आहेत. अमेरिकेवर झालेल्या ९/११ हल्ल्याच्या २० व्या स्मरणदिनाचे औचित्य साधून ही सैन्यमाघार घेतली जाईल. पण तालिबानने मात्र त्यावर आक्षेप घेतला आहे. १ मे पर्यंत अमेरिकेने सारे सैन्य माघारी घेण्याचे मान्य केले होते. त्यामुळे जोवर परदेशी सैन्य अफगाणिस्तानच्या भूमीवर तैनात असेल, तोपर्यंत तालिबान कुणाशीही, कुठल्याही प्रकारची चर्चा करणार नाही, असे तालिबानचा प्रवक्ता झबिउल्लाह मुजाहीद याने जाहीर केले. यानंतर अफगाणिस्तानच्या कंदहार प्रांतात स्फोट होऊन चार जण ठार झाल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे तालिबान अफगाणिस्तानात हिंसाचाराचे नवे सत्र सुरू करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेने अफगाणिस्तानातून माघार घेतली, तर या देशाचे लष्कर व सरकार तालिबानसमोर तग धरू शकणार नाही, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

मात्र अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी हा दावा खोडून काढला. अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. पण त्यांच्या माघारीनंतर अफगाणिस्तानचे सरकार कोसळेल, हा समज साफ चुकीचा आहे. अफगाणिस्तानचे लष्कराने उत्तम प्रशिक्षम घेतले असून ४० हजार इतक्या संख्येने असलेले अफगाणी लष्कर व वायूसेना तालिबानच्या आव्हानाचा सामना करील, असा विश्‍वास राष्ट्राध्यक्ष गनी यांनी व्यक्त केला. त्यामुळे अफगाणिस्तान तालिबानच्या हल्ल्यासमोर कोसळेल ही भीती निराधार असल्याचे अश्रफ गनी यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी तालिबानसमोर आता शांती किंवा हिंसा यापैकी एक मार्ग निवडण्याचा पर्याय आहे, याचीही जाणीव राष्ट्राध्यक्ष गनी यांनी करून दिली.

तालिबानसमोर शांती व रक्तपात असे दोन पर्याय ठेवताना, अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी आत्तापर्यंत तालिबानची पाठराखण करणार्‍या पाकिस्तानला खडसावले. तालिबान व इतर कट्टरपंथिय संघटनांशी सहकार्य करायचे की अफगाणिस्तानचे सरकार व आंतरराष्ट्रीय सहकार्य यांची निवड करायची, याचा निर्णय पाकिस्तानला घ्यावा लागणार आहे. पाकिस्तानने तालिबान व कट्टरपंथियांची साथ देण्याचा आत्मघातकी निर्णय घेतला तर त्याची झळ अफगाणिस्तानच्या शेजारी असलेल्या पाकिस्तानला बसल्यावाचून राहणार नाही, असा सज्जड इशारा राष्ट्राध्यक्ष गनी यांनी दिला आहे.

leave a reply