अंतराळाचे लष्करीकरण करून चीन अमेरिकेची जागा घेण्याच्या तयारीत

- अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेचा इशारा

वॉशिंग्टन – अंतराळातील अमेरिका आणि मित्रदेशांचे हितसंबंध सुरक्षित नाहीत. कारण चीन अंतराळाचे लष्करीकरण करीत असून आत्तापर्यंत अंतराळ तंत्रज्ञानात आघाडीवर असलेल्या अमेरिकेची जागा घेण्याची तयारी करीत आहे. असे झाले तर आपल्या क्षेपणास्त्रांचा वापर करून चीन अमेरिका आणि मित्रदेशांच्या उपग्रहांना लक्ष्य करील, असा इशारा अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने दिला. शीतयुद्धाच्या काळात रशियापासून अमेरिकेला जितका धोका होता, त्याहून अधिक धोका चीनपासून आहे, असे ‘सीआयए’चे संचालक विल्यम बर्न्स यांनी बजावले आहे.

गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या ‘ऑफिस ऑफ द डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स’चा अहवाल प्रसिद्ध झाला होता. या अहवालात अमेरिकी गुप्तचर यंत्रणेने चीनबाबत दिलेला इशारा गेले काही दिवस माध्यमांमध्ये चर्चेत आहे. अंतराळाचे लष्करीकरण करणे, ही चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीची योजना असल्याचे सदर अहवालात म्हटले आहे. अंतराळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देणे आणि अमेरिकेवर आघाडी मिळविणे, हा चीनच्या योजनेचा एक भाग असल्याचे या अहवालात सांगितले आहे.

यासाठी चीनने उपग्रहभेदी क्षेपणास्त्रे आणि लेझर्सची चाचणी घेतल्याची आठवणही या अहवालातून करून देण्यात आली आहे. लेझर्सच्या सहाय्याने अमेरिकन उपग्रहांचे ऑप्टिकल सेंसर्स निकामी किंवा नष्ट करता येतील, असा इशारा अमेरिकी गुप्तचर संस्थेने दिला. या व्यतिरिक्त २०२२ ते २०२४ यादरम्यान, चीन पृथ्वीच्या कक्षेत स्पेस स्टेशन उभारणार आहे. या स्पेस स्टेशनचा वापर देखील अंतराळाच्या लष्करीकरणासाठी आणि अमेरिकेचा प्रभाव कमी करण्यासाठी होऊ शकतो. अमेरिकेला लष्करीदृष्ट्या कमकुवत करण्यासंबंधी चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने आखलेल्या योजनेमध्ये सदर स्पेस स्टेशन महत्त्वाचे ठरू शकते, असे अमेरिकी गुप्तचर संस्थेने बजावले.

याशिवाय सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीने चीनचा प्रभाव वाढविण्यासाठी अमेरिका व अमेरिकेच्या मित्र तसेच सहकारी देशांमध्ये मतभेद निर्माण करण्याची योजना आखली आहे. असे झाल्यास चीनच्या हुकूमशाही व्यवस्थेला अनुकूल असलेले नवे आंतरराष्ट्रीय निकष तयार केले जातील, असे अमेरिकी गुप्तचर यंत्रणेने बजावले.

याशिवाय अमेरिकेची मुख्य गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’चे प्रमुख विल्यम बर्न्स यांनी कॉंग्रेसच्या समितीसमोर बोलताना, चीनपासून अमेरिकेला असलेल्या धोक्याची जाणीव करून दिली. ‘चीन अमेरिकेसाठी २१ व्या शतकातील सर्वात मोठे आव्हान ठरत आहे. शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएत रशियापासून अमेरिकेसमोर जो काही धोका निर्माण झाला होता, त्याहून अधिक धोका चीनच्या कम्युनिस्ट पार्टीपासून आहे. यामध्ये लष्करी धोक्यापासून ते वैचारिक, आर्थिक आणि तंत्रज्ञानविषयक धोक्यांचा देखील समावेश आहे’, असे बर्न्स यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणा चीनपासून आपल्या देशाला असलेला धोका अधोरेखित करीत आहेत. पण अमेरिकेचे बायडेन प्रशासन मात्र चीनच्या विरोधात कठोर भूमिका स्वीकारण्यासाठी तयार नाहीत, अशी गंभीर टीका बायडेन यांचे विरोधक करीत आहेत.

leave a reply