अफगाणिस्तानला दुपदरी शांततेची आवश्यकता

- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

नवी दिल्ली – ‘अफगाणिस्तानात आणि अफगाणिस्तानच्या सभोवती शांतता प्रस्थापित झाल्याखेरीज या देशाची समस्या सुटणार नाही. अजूनही अफगाणिस्तानात हजारो परदेशी रक्तपात घडवित आहेत. त्यांना अफगाणिस्तानच्या शांतीप्रक्रियेत स्थान असता कामा नये’, असे भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बजावले आहे. नवी दिल्लीतील रायसेना डायलॉग या सुरक्षाविषयक परिषदेत अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हमदुल्ला मोहिब आणि इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरिफ सहभागी झाले होते. त्यांच्याशी संवाद साधताना परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी पाकिस्तानचा थेट नामोल्लेख टाळून अफगाणिस्तानातील अस्थैर्याला पाकिस्तानच जबाबदार असल्याचा ठपका ठेवला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी ११ सप्टेंबर रोजी अफगाणिस्तानातून संपूर्ण सैन्यमाघारीची घोषणा केली आहे. नाटोने देखील आपले अफगाणिस्तानातील सैन्य माघारी घेण्याचे जाहीर केले आहे. यानंतर अफगाणिस्तानचे सरकार आणि तालिबानमध्ये घनघोर संघर्ष सुरू होईल, अशी चिंता अमेरिकेसह इतर देश व्यक्त करीत आहेत. यामुळे निर्माण?झालेल्या अस्थैर्याचा भारताच्या सुरक्षेवर परिणाम होईल आणि पाकिस्तान तालिबानचा वापर करून भारतात दहशतवाद माजविल, अशी दाट शक्यता वर्तविली जाते. अफगाणिस्तानचा भारताच्या विरोधात वापर होऊ देणार नाही, असे तालिबानचे नेते सांगत असले तरी भारत यांच्या आश्‍वासनाकडे अत्यंत सावधपणे पाहत आहे.

या पार्श्‍वभूमीवर, नवी दिल्लीतील रायसेना डायलॉगमध्ये अफगाणिस्तानवर चर्चा पार पडली. व्हर्च्युअल माध्यमातून या चर्चेत भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अफगाणिस्तानचे स्थैर्य व सुरक्षेसाठी भारत सर्वतोपरी सहकार्य करील, अशी ग्वाही दिली. त्याचवेळी अफगाणिस्तानात व सभोवतालच्या देशांमध्ये शांतता प्रस्थापित झाल्याखेरीज अफगाणिस्तानची समस्या सुटणार नाही, असा टोला परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी लगावला. अफगाणिस्तानातील अस्थैर्य, अराजक व रक्तपात यांचे मूळ पाकिस्तानात असल्याचे आरोप भारत, अमेरिका व अफगाणी सरकारने अनेकवार केले होते. अफगाणिस्तानला ‘डबल पीस’ अर्थात दुहेरी शांततेची आवश्यकता असल्याचे सांगून भारताचे परराष्ट्रमंत्री याच समस्येकडे बोट दाखवित आहेत.

अफगाणिस्तानात हजारो परदेशी दहशतवादी लढत आहेत. त्यांना अफगाणिस्तानच्या शांतीप्रक्रियेत कुठल्याही प्रकारचे स्थान मिळता कामा नये, असे जयशंकर यांनी बजावले आहे. त्याचवेळी अफगाणिस्तानच्या शांतीप्रक्रियेचे आयोजन व संचलन आणि नियमन अफगाणींकडूनच केले जावे, अशी भारताची फार आधीपासूनची मागणी असल्याची बाब जयशंकर यांनी लक्षात आणून दिली. पाकिस्तानसारख्या देशाला अफगाणिस्तानच्या शांती प्रक्रियेत स्थान मिळू नये, असे भारताचे परराष्ट्रमंत्री वेगळ्या शब्दात सांगत आहेत.

तर अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हमदुल्लाह मोहिब यांनीही जयशंकर यांच्या दाव्यांना दुजोरा दिला. तालिबानने हिंसेचा मार्ग सोडून अफगाणिस्तानच्या सरकारशी चर्चा सुरू करावी, असे आवाहन मोहिब यांनी केले. तर इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरिफ यांनीही तालिबानने अफगाणिस्तानच्या सरकारशी चर्चा करावी, असा सल्ला दिला आहे. तालिबानने अफगाणिस्तानच्या सरकारबरोबर व्यापक चर्चा सुरू करावी. या आघाडीवर उशीर करणे घातक ठरेल, असा इशारा इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिला आहे.

leave a reply