पाकिस्तानातील आश्रयस्थानामुळे तालिबानला अमेरिकेच्या विरोधात यश मिळाले

- अमेरिकेचे सिनेटर जॅक रिड

वॉशिंग्टन – ‘पाकिस्तानात उपलब्ध असलेल्या आश्रयस्थानामुळेच तालिबानला अमेरिकेच्या विरोधात इतके यश मिळाले. अफगाणिस्तानातील दहशतवादविरोधी युद्धात पाकिस्तान अमेरिका व तालिबान अशा दोन्ही बाजूने खेळत होता’, अशी जळजळीत टीका अमेरिकन सिनेटच्या ‘आर्म्ड सर्व्हिसेस कमिटी’चे प्रमुख सिनेटर जॅक रिड यांनी केली. त्याचवेळी अमेरिकेच्या अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीनंतर, पाकिस्तानच्या तालिबानबरोबरील सहकार्यामुळे अमेरिकेची व मित्रदेशांचीही सुरक्षा धोक्यात येईल, असा इशारा रिड यांनी दिला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी अफगाणिस्तानातून सैन्यमाघारीची घोषणा केल्यानंतर, यावर अमेरिकेच्या संसदेत सर्वच बाजूने विचार केला जात आहे. अमेरिकन संसदेच्या ‘हाऊस इंटेलिजन्स कमिटी’समोर बोलताना सीआयएचे प्रमुख विल्यम बर्न्स यांनी अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीबाबतचे बायडेन प्रशासनाची योजना मांडली. तालिबानचे पाकिस्तानबरोबरील संबंध, पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संघटना ‘आयएसआय’चे तालिबानच्या हक्कानी नेटवर्कबरोबरील साटेलोटे, हे सारे लक्षात घेता, अमेरिकेच्या सैन्यमाघारीनंतर अफगाणिस्तानात काय होऊ शकेल, याबाबत कमिटीने विचारलेल्या प्रश्‍नांना सीआयएसच्या प्रमुखांनी उत्तरे दिली. अफगाणिस्तानच्या लोकशाही, शांती व स्थैर्यासाठी अमेरिका पाकिस्तानला सहकार्य करण्यास भाग पाडेल, असे बर्न्स यांनी यावेळी स्पष्ट केले.

अफगाणिस्तानची लोकशाही प्रक्रिया, स्थैर्य व शांतता यात पाकिस्तानचेही हित सामावलेले आहे. अन्यथा अफगाणिस्तान अस्थीर व अशांत बनला तर त्याचे परिणाम पाकिस्तानवरही झाल्याखेरीज राहणार नाहीत. त्यामुळे अफगाणिस्तानातील लोकशाहीसाठी सहकार्य करण्यास बायडेेन प्रशासन पाकिस्तानला भाग पाडेल, असा विश्‍वास बर्न्स यांनी व्यक्त केला. मात्र सीआयएच्या प्रमुखांनी केलेल्या दाव्यांना छेद देणारी प्रतिक्रिया अमेरिकन सिनेटच्या ‘आर्म्ड सर्व्हिसेस कमिटी’चे प्रमुख सिनेटर जॅक रिड यांनी दिली. ‘अफगान स्टडी ग्रूप’ या अमेरिकन संसदेची मान्यता असलेल्या अभ्यासगटाने केलेल्या धक्कादायक आरोपांचा दाखला देऊन जॅक रिड यांनी पाकिस्तानचे वाभाडे काढले आहेत.

अमेरिकेसारखी महासत्ता अफगाणिस्तानात दोन दशकांपर्यंत युद्ध खेळूनही विजयी ठरली नाही. तालिबानची मागणी मान्य करून अमेरिकेला अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घ्यावे लागत आहे. अमेरिकेच्या या सैन्यमाघारीकडे तालिबान आपला विजय म्हणून पाहत आहे. ट्रिलियन्स डॉलर्सचा चुराडा व २४०० अमेरिकन जवान गमावून अमेरिकेने अफगाणिस्तानात नक्की काय साधले, असे प्रश्‍न विचारले जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर, जॅक रिड यांनी अफगाणिस्तानात तालिबानला मिळालेल्या यशाचे श्रेय पाकिस्तानात असलेल्या तालिबानच्या आश्रयस्थानांना जाते, असा ठपका ठेवला. अमेरिकेने पाकिस्तानातील या आश्रयस्थानांवर कारवाई न केल्यामुळे तालिबानला अफगाणिस्तानात हल्ले चढविणे सोपे गेले. पाकिस्तान तालिबानला अमेरिकेच्या विरोधात आवश्यक ती गोपनीय माहिती पुरवित होता. इतकेच नाही तर या युद्धात पाकिस्तान अमेरिकेच्या बाजूने व तालिबानच्याही मागे उभे राहून दोन्ही बाजूंनी?खेळत होता, असा आरोप सिनेटर जॅक रिड यांनी केला.

तालिबानबरोबरील पाकिस्तानचे सहकार्य अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या सैन्यमाघारीनंतर अधिकच घातक बनेल. यापासून अमेरिकेच्या व अमेरिकेच्या मित्रदेशांच्या सुरक्षेला गंभीर धोका संभवतो, याकडेही रिड यांनी लक्ष वेधले. आत्तापर्यंत अफगाणिस्तान, इराक आणि आपल्या अंतर्गत समस्यांमुळे अमेरिकेच्या आधीच्या प्रशासनांना पाकिस्तानकडे लक्षच केंद्रीत करता आले नाही. यामुळे पाकिस्तानची समस्या गंभीर बनली आहे, असे सिनेटर रिड यांनी बजावले आहे.

leave a reply