अफगाणिस्तानचा वापर दहशतवादासाठी होऊ नये

- भारताने आयोजित केलेल्या बैठकीतील प्रमुख मागणी

नवी दिल्ली – ‘अफगाणिस्तानातील उलथापालथींचा परिणाम केवळ अफगाणी जनतेवरच नाही तर शेजारी देश व या क्षेत्रावर होत आहे. त्याकडे अत्यंत बारकाईने पाहणे गरजेचे ठरते. अफगाणिस्तानातील या आव्हानाला सामोरे जाताना, या क्षेत्रातील देशांना त्यावर सल्लामसलत, घनिष्ठ सहकार्य, उत्तम संपर्क व समन्वय प्रस्थापित करावा लागेल. आजच्या काळात त्याची नितांत आवश्यकता आहे’, असे सांगून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी भारतानेच आयोजित केलेल्या अफगाणिस्तानविषयक बैठकीत आपली भूमिका मांडली.

अफगाणिस्तानचा वापर दहशतवादासाठी होऊ नये - भारताने आयोजित केलेल्या बैठकीतील प्रमुख मागणी‘द दिल्ली रिजनल सिक्युरिटी डायलॉग ऑन अफगानिस्तान’ला संबोधित करताना डोवल यांनी अफगाणिस्तानातील परिस्थितीचा प्रभाव या क्षेत्रावर होईल, ही बाब अधोरेखित केली. रशिया, इराण, कझाकस्तान, किरगिझिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकीस्तान या सात देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार भारताने आयोजित केलेल्या या बैठकीत सहभागी झाले. तर पाकिस्तान व चीनने या परिषदेत सहभागी होण्यास नकार दिला. या पार्श्‍वभूमीवर, रशिया व इराणसह मध्य आशियाई देशांनी सदर परिषदेत सहभागी होऊन अफगाणिस्तानबाबतच्या भारताच्या भूमिकेला दुजोरा दिला. या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात याचे प्रतिबिंब पडले आहे.

अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होऊ नये. हा देश आंतरराष्ट्रीय दहशतवादाचे केंद्र बनता कामा नये, अशी प्रमुख मागणी या संंयुक्त निवेदनात करण्यात आली. शांत, सुरक्षित, स्थीर अफगाणिस्तानला आमचा पूर्ण पाठिंबा असेल. त्याचवेळी अफगाणिस्तानचे सार्वभौमत्त्व, प्रादेशिक एकात्मता व अखंडता याचा आदर व्हाव व अफगाणिस्तानच्या अंतर्गत कारभारत कुणाचाही हस्तक्षेप असू नये, अशी अपेक्षा या संयुक्त निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. थेट उल्लेख केला नसला, तरी अफगाणिस्तानचा भारतविरोधी दहशतवादी कारवायांसाठी तसेच अमली पदार्थांच्या व्यापारासाठी वापर करू पाहणार्‍या पाकिस्तानला लक्ष्य करून संयुक्त निवेदनात ही मागणी करण्यात आल्याचे दिसते.

कट्टरवाद, विघटनवाद आणि अमली पदार्थांचा व्यापार यांच्या विरोधात एकजुटीने करवाई करण्याचे सदर संयुक्त निवेदनात मान्य करण्यात आले आहे. तसेच अफगाणिस्तानात खडी ठाकत असलेली मानवी आपत्ती व आर्थिक-सामाजिक पातळीवरील संकट यावर आठही देशांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. संयुक्त निवेदनात त्याचा उल्लेख करून अफगाणी जनतेला थेट आंतरराष्ट्रीय सहाय्य मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

‘आमचे हे प्रयत्न अफगाणी जनतेला सहाय्य पुरविण्यासाठी प्रभावी ठरतील. तसेच यामुळे सुरक्षा सुनिश्‍चित होईल’, असा विश्‍वास यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी व्यक्त केला.

दरम्यान, या बैठकीत सहभागी झालेले सातही देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि पंतप्रधान मोदी यांची भेट झाली. यावेळी झालेल्या चर्चेचे तपशील अद्याप उघड झालेले नाहीत. मात्र पाकिस्तान आणि चीनने पाठ फिरविलेल्या या चर्चेला यश मिळणार नाही, हा पाकिस्तानने केलेला दावा यामुळे धुळीला मिळाला. तालिबानने देखील भारतात होत असलेल्या या बैठकीचे स्वागत केले आहे. भारताने आयोजित केलेल्या या बैठकीबाबत आपण आशावादी असल्याचे तालिबानने जाहीर केले. पुढच्या काळात अफगाणिस्तानात भारताचे सहाय्य व गुंतवणुकीचे स्वागतच होईल, असेही तालिबानने म्हटले आहे.

leave a reply