येमेनमधील सौदीच्या कारवाईत साडेतीनशे हौथी बंडखोर ठार

हौथी बंडखोरसना – गेल्या तीन दिवसात येमेनचे लष्कर, सौदी अरेबिया आणि अरब मित्रदेशांनी मरिब प्रांतात केलेल्या कारवाईत ३५० हून अधिक हौथी बंडखोरांना ठार झाले. या कारवाईत हौथी बंडखोरांचा मोठा शस्त्रसाठा उद्ध्वस्त केल्याचा दावा मित्रदेशांचे लष्कर करीत आहे.

मरिब प्रांताचा ताबा घेण्यासाठी प्रयत्न करणार्‍या हौथी बंडखोरांविरोधात येमेन व अरब मित्रदेशांचे लष्कर सलग तीन दिवस हल्ले चढवित आहेत. या हल्ल्यांमध्ये रविवारी १३८, सोमवारी ११५ तर मंगळवारी १०० हौथी बंडखोरांना ठार केल्याची माहिती सौदीच्या माध्यमांनी उघड केली. यापैकी मंगळवारच्या कारवाईत हौथीच्या ठिकाणांवर ३० हल्ले चढविले. यामध्ये बंडखोरांनी बळकावलेले रणगाडे, लष्करी वाहने उद्ध्वस्त केल्याचा दावा अरब मित्रदेशांच्या लष्कराने केला.

गेले महिनाभर सौदी व अरब मित्रदेशांकडून मरिब प्रांतात हौथी बंडखोरांवर हल्ले सुरू आहेत. या हल्ल्यात हौथी बंडखोर मोठ्या संख्येने मारले जात असल्याचा दावा सौदी व मित्रदेश करीत आहेत. हौथी बंडखोर इराणमुळे शस्त्रसज्ज होत असल्याचा आरोप येमेनचे हादी सरकार व सौदी करीत आहे. हौथींचे शस्त्रसज्ज होणे येमेनी जनतेच्या सुरक्षेसाठी धोक्याचे असून आंतरराष्ट्रीय समुदायाने ही शस्त्रतस्करी रोखावी, असे आवाहन सौदी व येमेन करीत आहे.

हौथी बंडखोरपण मरिबमध्ये हा संघर्ष सुरू असताना, हौथी बंडखोरांनी राजधानी सना व आसपासच्या भागातून २५ जणांना अटक केली. येमेनमधील अमेरिकेच्या दूतावासमधील कर्मचारी तसेच ‘युएस एड’ या अमेरिकेच्या सहाय्य विभागासाठी काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा समावेश आहे. त्यांच्या अपहरणामागचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.

दरम्यान, येमेनचे राष्ट्राध्यक्ष हादी यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या एडन शहरात मंगळवारी कारबॉम्बस्फोट झाला. यामध्ये गरोदर महिला पत्रकाराचा बळी गेला. तर तिचा पती गंभीर जखमी झाला आहे. या कारबॉम्बस्फोटाचे तीव्र पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटले असून याचा तीव्र शब्दात निषेध होत आहे. महिन्याभरात एडनमध्ये झालेला हा दुसरा कार बॉम्बस्फोट ठरतो.

दरम्यान, लष्करी संघर्षात येमेनमधील मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून मानवतावादी संकट अधिकाधिक तीव्र होऊ लागले आहे. यामुळे येमेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरू असणार्‍या प्रयत्नांना हादरे बसत आहेत’, अशी चिंता संयुक्त राष्ट्रसंघाचे विशेषदूत हॅन्स ग्रुडनबर्ग यांनी व्यक्त केली.

leave a reply