देशात पहिल्यांदाच ‘आफ्रिकन स्वाईन फ्लू’चा शिरकाव

आसाममध्ये २५०० डुक्करांचा मृत्यू

नवी दिल्ली – कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना देशात पहिल्यांदाच आफ्रिकन स्वाईन फ्लूने शिरकाव केला आहे. आसाममध्ये आफ्रिकी स्वाईन फ्लूने २५०० हुन अधिक डुक्करांचा मृत्यू झाला आहे. गेल्यावर्षी भारताच्या सीमेनजीक चीनमध्ये हा स्वाईन फ्ल्यू आढळला होता.

आसाममध्ये आफ्रिकन स्वाईन फ्लूमुळे ३०६ गावातील २५०० पेक्षा अधिक डुक्करांचा मृत्यू झाल्याचे आसाम सरकारने जाहीर केले. केंद्र सरकारने डुक्करांना मारण्याची मंजुरी दिल्यानंतरही राज्य सरकार त्यांना मारण्याऐवजी आफ्रिकी स्वाईन फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी दुसरा पर्यायी मार्ग शोधणार असल्याचे आसामधील पशुपालनमंत्री अतुल बोरा यांनी म्हटले आहे.

भोपाळमधील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशु रोग संस्थेने (एनआयएचएसएडी) हा आफ्रिकी स्वाईन फ्लू (एएसएफ) असल्याचे स्पष्ट केले आहे. देशात आफ्रिकी स्वाईन फ्लूचा पहिल्यांदाच शिरकाव झाला आहे. आफ्रिकी स्वाईन फ्लूचा कोरोना व्हायरसशी काहीही संबंध नसल्याचे बोरा यांनी सांगितले. फेब्रुवारी महिन्यात स्वाईन फ्लू बाबत माहिती मिळाली होती. मात्र त्या संदर्भांत चाचणी अहवाल येणे बाकी होते. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात अरुणाचल प्रदेशचा सीमेला लागून असलेल्या चीनच्या एका प्रांतात आफ्रिकन स्वाईन फ्लू आढळला होता. त्यानंतर आसाम मार्गाने स्वाईन फ्लूचा शिरकाव झाला.

राज्याला आफ्रिकन स्वाइन पासून वाचवण्यासाठी एक व्यापक रोडमॅप बनवण्याच्या सूचना मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी पशुवैद्यकीय वन विभागाला दिल्या आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ अग्रीकल्चर रिसर्च च्या नॅशनल रिसर्च सेंटर सोबत काम करून हा रोडमॅप बनवण्यात सांगितले गेले आहे. डुकरांना सध्या मारण्यात येणार नाही. तूर्तास या स्वाईन फ्ल्यूने डुक्करांचा मृत्यू झालेल्या भागांमध्ये एक किलोमीटरचा परिसर बंद करण्यात येणार असून 10 किलोमीटर परिसरावर लक्ष ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती आसाम सरकारने दिली.

leave a reply