कोरोनाव्हायरसची ‘अँटीबॉडी’ विकसित केल्याचा इस्रायलचा दावा

जेरुसलेम – इस्रायलच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल रिसर्च’ या संरक्षण क्षेत्रातील संस्थेने कोरोनाव्हायरसची ‘अँटीबॉडी’ विकसित केल्याचा दावा इस्रायली संरक्षणमंत्री नफ्ताली बेनेट यांनी केला आहे. हा एक अत्यंत महत्वाचा टप्पा असल्याचेही बेनेट यांनी सांगितले असून त्याचे पेटंट व उपचारासाठी वापर करण्याबाबत पुढे पावले टाकण्यात येत असल्याचेही स्पष्ट केले. ‘इस्रायल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल रिसर्च’ (आयआयबीआर) ही संस्था इस्रायली संरक्षणदलातील ‘सिक्रेट युनिट’ म्हणून ओळखण्यात येते.

चीनमधून सुरू झालेली कोरोनाव्हायरसची साथ जगभरात हाहाकार माजवित आहे. विविध देशांमध्ये या साथीवर उपचार तसेच लस विकसित करण्यासाठी संशोधन सुरू आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या १०० हुन अधिक संस्था व कंपन्या कोरोनाव्हायरस साथीवर लस व औषध विकसित करण्याचे प्रयत्न करीत आहेत. काही दिवसांपूर्वी ब्रिटनच्या ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी’ने लस विकसित केल्याच्या व त्याच्या चाचण्या सुरू केल्याची माहिती दिली होती. तर अमेरिकेतील कंपनीने औषध तयार केल्याचा दावा केला होता. इस्रायल यात आघाडीवर असून दोन महिन्यांपूर्वी देशातील एका संस्थेने महत्त्वाचे यश मिळविल्याचा दावाही केला होता. या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री बेनेट यांनी ‘आयआयबीआर’ला दिलेली भेट व त्यानंतर केलेला दावा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

‘कोरोनाव्हायरसची अँटीबॉडी विकसित करण्याचे काम पूर्ण झाले आहे. ही अँटीबॉडी विषाणूवर हल्ला करून आजारी व्यक्तीच्या शरीरातील विषाणू पूर्णतः निष्प्रभ करून टाकते. पेटंट घेण्याची प्रक्रिया सुरू असून अँटीबॉडीचे व्यावसायिक स्तरावर उत्पादन घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबर बोलणी लवकरच चालू होतील’, अशी माहिती संरक्षणमंत्री बेनेट यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली.

इस्रायलच्या संरक्षण विभागाने केलेल्या या दाव्यापूर्वी पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी एका आंतरराष्ट्रीय परिषदेत, कोरोना साथीविरोधातील लढ्यासाठी इस्रायल सरकार सहा कोटी डॉलर्सचे साहाय्य करेल, अशी घोषणा केली. ही घोषणा करीत असतानाच त्यांनी इस्रायली संशोधक व संस्था कोरोनाव्हायरसच्या साथीविरोधात महत्त्वाचे योगदान देतील, असा विश्वासही व्यक्त केला होता.

इस्रायल कोरोनाव्हायरसवरील लस किंवा औषध सर्वात आधी विकसित करण्यात यश मिळवेल, अशी माहिती यापूर्वीही देण्यात आली होती. इराणमध्ये कोरोनाच्या साथीचा धुमाकूळ सुरू झाल्यानंतर इस्रायली लसीच्या मुद्यावर चर्चाही घेण्यात आली होती. त्यावेळी एका इराणी धर्मगुरूंनी, जर दुसरा पर्याय नसेल तर इस्रायलकडूनही लस घेण्यास हरकत नाही, असा सल्ला दिला होता. मात्र त्यावेळी इस्रायलने लस विकसित केल्याचे नाकारले होते.

leave a reply