ज्यो बायडेन यांच्या शपथविधीच्या पार्श्‍वभूमीवर मध्य अमेरिकेतील होंडुरासमधून हजारो निर्वासितांचा लोंढा अमेरिकेच्या दिशेने

वॉशिंग्टन/टेगुसिगाल्पा – पुढील आठवड्यात डेमोक्रॅट पक्षाचे ज्यो बायडेन राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. त्याची तयारी सुरू असतानाच मध्य अमेरिकेतील होंडुरासमधून हजारो निर्वासितांचा लोंढा अमेरिकेच्या सीमेवर दाखल होण्याचे संकेत मिळाले आहेत. २०१८ व २०१९ अशी सलग दोन वर्षे होंडुरास तसेच मेक्सिकोतील निर्वासितांनी अमेरिकेच्या सीमेत घुसण्याचे प्रयत्न केले होते. मात्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कठोर भूमिका घेऊन ही घुसखोरी उधळून लावली होती. मात्र बायडेन यांनी निर्वासितांच्या मुद्यावर सौम्य भूमिका घेण्याचे संकेत दिल्याने पुन्हा एकदा नवे लोंढे मोठ्या प्रमाणात अमेरिकेत दाखल होतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गुरुवारी रात्री होंडुरासमधील ‘सॅन पेड्रो सुला’ भागातून सुमारे तीन हजार निर्वासितांचा लोंढा अमेरिकेच्या दिशेने निघाल्याची माहिती समोर आली आहे. नोव्हेंबर महिन्यात होंडुरासला एकापाठोपाठ एक दोन चक्रीवादळांनी तडाखा दिला होता. त्यापाठोपाठ कोरोनाच्या साथीनेही हाहाकार उडविला असून, चांगल्या भविष्यासाठी अमेरिकेत जात असल्याचे निर्वासितांचे म्हणणे आहे. अमेरिकेत जाण्यापूर्वी या निर्वासितांच्या लोंढ्याला ग्वाटेमाला व मेक्सिको या दोन देशांमधून प्रवास करावा लागणार आहे.

सध्या कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर अनेक देशांनी मोठ्या प्रमाणात निर्बंध लादले असून ग्वाटेमाला व मेक्सिकोमध्येही असे निर्बंध लागू आहेत. त्यामुळे निर्वासितांच्या लोंढ्याला यापैकी एका देशात अडविण्यात येईल, असे मानले जाते. २०१९ साली अमेरिकेने या देशांबरोबर सुरक्षा करार केला असून त्यात अवैध निर्वासितांचे लोंढे व गुन्हेगारी टोळ्यांना रोखण्यासंदर्भातील तरतुदी आहेत. त्यामुळे संबंधित देशांवर अशा लोंढ्यांना रोखण्याची कायदेशीर जबाबदारी आहे. असे असतानाही होंडुरासमधील हजारो निर्वासितांच्या लोंढ्याने अमेरिकेच्या दिशेने वाटचाल सुरू करणे लक्ष वेधून घेणारे ठरते.

निर्वासितांच्या या प्रयत्नांमागे अमेरिकेत झालेला सत्ताबदल व भावी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची निर्वासितांबाबतची भूमिका या गोष्टी कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते. बायडेन व त्यांच्या डेमोक्रॅट पक्षाने अमेरिकेत येणार्‍या निर्वासितांच्या लोंढ्यांबाबत कायम सौम्य भूमिका घेतली असून त्यांना अधिकाधिक संरक्षण पुरविणारे कायदे व तरतुदी केल्या आहेत. गेल्याच महिन्यात अमेरिकेत राहणार्‍या होंडुरास व ग्वाटेमालातील हजारो अवैध निर्वासितांना ‘टेम्पररी प्रोटेक्टेड स्टेटस’ देण्यासाठी बायडेन यांच्या टीमने हालचाली सुरु केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.

विद्यमान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या कारकिर्दीत घुसखोर निर्वासितांच्या हकालपट्टीची प्रक्रिया सुरू केली होती. त्याचवेळी मेक्सिको सीमेवर ‘बॉर्डर वॉल’चे काम सुरू करून तसेच अतिरिक्त सुरक्षायंत्रणा तैनात करून निर्वासितांच्या लोंढ्यांना पायबंद घालण्याचे प्रयत्न केले होते. निर्वासितांनी सीमेपर्यंत पोहोचू नये यासाठी संबंधित देशांबरोबर केलेले करारही लोंढे रोखण्याच्या प्रयत्नांचाच भाग ठरतो. मात्र सत्ताबदलानंतर अमेरिकी प्रशासनाची भूमिका बदलू शकते, हे लक्षात घेऊन होंडुरास, ग्वाटेमाला व मेक्सिकोच्या राजवटी निर्वासितांच्या लोंढ्याला मोकळीक देऊ शकतात, अस दावा काही विश्‍लेषकांकडून करण्यात येत आहे.

२०१९ साली झालेल्या ‘स्टेट ऑफ युनियन’ भाषणात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी, देशाच्या दक्षिण सीमेवरून घुसणारे लोंढे हे राष्ट्रीय संकट असल्याचा इशारा दिला होता.

leave a reply