चीन-तैवानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जपानच्या संरक्षण धोरणात आक्रमक बदल

– जपानच्या सागरी क्षेत्रात १२ देशांच्या नौदलांचा सराव
– जपान हायपरसोनिक क्षेपणास्त्राची निर्मिती करणार

japan missileटोकिओ – रविवारपासून जपानच्या योकोसूका बंदरात १२ देशांचा मोठा युद्धसराव सुरू झाला असून पुढच्या काही तासात ‘क्वाड’ देशांचा स्वतंत्र मलबार युद्धसरावही आयोजित केला जाणार आहे. तसेच जपानने पुढच्या पाच वर्षांमध्ये स्वत:ला संरक्षण क्षेत्रात पूर्णपणे सुसज्ज करण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी जपान हायपरसोनिक क्षेपणास्त्र तसेच हल्लेखोर ड्रोन्सच्या निर्मितीवर काम करणार आहे. चीनपासून संभवणारा धोका वाढत असताना, जपानच्या संरक्षणाची हमी देणाऱ्या अमेरिकेवरील जपानचा अविश्वास देखील त्याच प्रमाणात वाढत आहे. त्याचे प्रतिबिंब जपानच्या या नव्या संरक्षणविषयक धोरणात पडत असल्याचे दिसते.

japan fleet reviewशी जिनपिंग सलग तिसऱ्यांदा चीनचे राष्ट्राध्यक्ष बनले असून कम्युनिस्ट पक्षावरील त्यांची पकड अधिक मजबूत झाली आहे. चीनची सूत्रे हातात घेतल्यानंतर राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी पिपल्स लिबरेशन आर्मीला युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. तर गेल्या आठवड्याभरात उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेऊन या क्षेत्रातील तणाव वाढविला आहे. यातील एक आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र जपानच्या सागरी क्षेत्राजवळ कोसळले होते. अशा काळात जपानच्या योकोसूका बंदराच्या सागरी क्षेत्रात जपान व मित्रदेशांचा मोठा सराव सुरू झाला आहे.

यामध्ये जपानसह भारत, अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंड या प्रमुख देशांच्या ३८ युद्धनौकांचा समावेश आहे. तसेच ३३ लढाऊ विमाने आणि पाणबुडीचा शोध घेणारी गस्तीविमाने आणि हेलिकॉप्टर्स देखील या सरावात सहभागी झाले आहेत. यामध्ये अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका ‘युएसएस रोनाल्ड रिगन’चाही समावेश असल्याचा दावा केला जातो. तर भारताच्या ‘आयएनएस शिवालिक’ आणि ‘आयएनएस कमोर्टा’ या दोन विनाशिका या सरावात सहभागी झाल्या आहेत.

japan fleetजपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी या सरावाची पाहणी केली. तसेच ‘आंतरराष्ट्रीय सागरी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि आपल्या सामर्थ्याचा गैरवापर करून इतर देशांची शांती व सुरक्षा पायदळी चिरडणाऱ्या देशांविरोधी कारवाईसाठी आपण सज्ज असले पाहिजे’, असे आवाहन पंतप्रधान किशिदा यांनी केले. दोन दिवसांचा हा सराव संपल्यानंतर मंगळवारपासून अमेरिका, भारत, जपान व ऑस्ट्रेलिया या ‘क्वाड’ देशांच्या नौदलाचा ‘मलबार’ युद्धसराव देखील जपानमध्ये सुरू होणार आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील स्थैर्य व सुरक्षेसाठी हा सराव आयोजित केल्याचे जपानने म्हटले आहे.

या सरावाबरोबरच जपानने पुढील पाच वर्षांसाठी आपले संरक्षण धोरण स्पष्ट केले आहे. अमेरिका, रशिया, चीन व भारताप्रमाणे जपान देखील हायपरसोनिक क्षेपणास्त्राच्या निर्मितीसाठी प्रयत्न करणार आहे. जपानच्या संरक्षणदलात असलेल्या जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांना हायपरसोनिक इंटरसेप्टर बनविण्यासाठी जपानचे सरकार व संरक्षणदल विचार करीत आहे. २०२९ सालापर्यंत जपान सदर क्षेपणास्त्राची निर्मिती पूर्ण करील, असा दावा केला जातो. त्याचबरोबर जपान आत्मघाती ड्रोन्सच्या निर्मितीसाठी देखील प्रयत्न करीत आहे. चीनच्या वाढत्या आक्रमकतेच्या पार्श्वभूमीवर जपानने या हालचाली सुरू केल्याचे जपानी माध्यमांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर आत्तापर्यंत जपानच्या सुरक्षेची हमी देणाऱ्या अमेरिकेवरील विश्वास डळमळीत झाल्यामुळे जपानला ही पावले उचलावी लागत असल्याचा दावा विश्लेषक करीत आहेत.

leave a reply