युद्धसरावात सौदीचे ‘एफ-१५’ लढाऊ विमान कोसळले

इराणने घातपात घडविल्याचा आंतरराष्ट्रीय विश्लेषकांचा दावा

iran electronic warfare systemरियाध- सौदी अरेबियाच्या किंग अब्दुलअझिझ हवाईतळावर युद्धसराव सुरू असताना ‘एफ-१५’ लढाऊ विमान कोसळले. सावध असलेले दोन्ही वैमानिक या दुर्घटनेतून बचावल्याचे सौदीच्या संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले. पण ही दुर्घटना नसून घातपात असल्याचा दावा लष्करी विश्लेषक करीत आहेत. काही दिवसांपूर्वीच इराणने दीर्घ पल्ल्यापर्यंत वेध घेऊ शकणारी इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टिम कार्यान्वित केली होती. त्यामुळे इराणने सौदीचे विमान पाडले असावे, अशी शंका विश्लेषक व्यक्त करीत आहेत. इराण सौदीच्या ठिकाणांवर हल्ल्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाल्या होत्या, याकडेही सदर विश्लेषक लक्ष वेधत आहेत.

दोन दिवसांपूर्वी, रविवारी रात्री सौदी अरेबियाच्या हवाईदलाचा सराव सुरू होता. येथील तैफ भागात सौदीच्या लढाऊ विमानांचा अभ्यास सुरू असताना ‘एफ-१५एस’ प्रकारातील प्रगत लढाऊ विमान अचानक किंग अब्दुलअझिझ हवाईतळाच्या आवारात कोसळले. सौदीच्या यंत्रणेने २४ तास या घटनेची माहिती उघड केली नव्हती. पण सोशल मीडियावर सौदीचे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोमवारी रात्री सौदीच्या संरक्षण मंत्रालयाने याचे तपशील उघड केले.

F-15विमान कोसळण्याआधी दोन्ही वैमानिकांनी सुखरूप बाहेर उडी घेतल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली. तसेच दुर्घटनेचे कारण शोधून काढण्याचे काम सुरू असून तांत्रिक बिघाडामुळे ही दुर्घटना घडल्याची शक्यताही वर्तविली. पण आंतरराष्ट्रीय विश्लेषक सौदीच्या विमानाबाबत घडलेल्या प्रकाराविषयी वेगळीच शक्यता वर्तवित आहेत. ही सर्वसामान्य दुर्घटना नसून हा घातपात असावा, असा दावा लष्करी विश्लेषक करीत आहेत. सौदीच्या विमानामागील घातपातासाठी इराण जबाबदार असल्याची शक्यता या संघटनेने वर्तविली. सौदीच्या या हवाईसरावाच्या काही दिवस आधीच इराणने दीर्घ पल्ल्याच्या इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टिम दाखल करून घेतल्याची घोषणा केली होती. रशियन बनावटीच्या ‘क्रासुखस’ची नक्कल करून इराणने सदर यंत्रणा तयार केल्याचा दावा केला जातो. तसेच सौदीच्या विमानाची दुर्घटना रविवारी नाही तर, २५ ऑक्टोबर रोजी झाली असावी, अशी माहिती समोर येत आहे. कारण सौदीच्या विमान दुर्घटनेचा व्हायरल झालेला व्हिडिओ २५ ऑक्टोबर रोजीच सोशल मीडियावर टाकण्यात आला होता. तर इराणने २३ ऑक्टोबर रोजी इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टिम बसविली होती, याकडे विश्लेषक लक्ष वेधत आहेत.

इराणचे उपसंरक्षणमंत्री अफशीन नादेरी शरीफ यांनी २३ ऑक्टोबर रोजी हवाई सुरक्षा यंत्रणा बसविल्याचे जाहीर केले होते. या यंत्रणेमुळे ४०० किलोमीटर अंतरावरील शत्रूच्या विमानाचे नेटवर्क बाधित करता येऊ शकते, अशी घोषणा शरीफ यांनी केली होती. त्यामुळे सौदीचे एफ-१५ विमान तैफमध्ये पोहोचण्याआधीच सदर विमानाचे नेटवर्क जॅम करण्यात आले असावे, असा दावा आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी केला. त्यामुळे सौदीच्या विमानावरील संशयित घातपातामागे इराण असल्याचे या विश्लेषकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, सौदीच्या इंधन कंपन्या, तळ आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांवर इराण हल्ले चढवू शकतो, असा दावा अमेरिकेच्या वर्तमानपत्रांनी केला होता. सौदीच्या गुप्तचर विभागानेच अमेरिकेला ही माहिती दिल्याचे या वर्तमानपत्राने म्हटले होते. सौदीने यावर अधिकृत पातळीवर प्रतिक्रिया दिलेली नाही. तर इराणने अमेरिकेचे हे आरोप फेटाळून अमेरिका इराण व सौदीमध्ये वाद पेटवून देत असल्याचा आरोप केला होता. यानंतर अमेरिकेने इराणविरोधी कारवाईसाठी आपली लढाऊ विमाने रवाना केल्याच्या बातम्या आल्या होत्या.

leave a reply